
मुंबई प्रतिनिधी
“सायंकाळी ६:२३ ला माणूस नव्हता, धडाधड स्फोट होते… रक्ताचे तांदळासारखे तुकडे आणि सायलेन्समध्ये गडगडणारे अश्रू!”
२००६ सालची ती जुलैची काळरात्र… मुंबईची लोकल नेहमीसारखीच गर्दीने भरलेली. पण कोणालाही वाटले नव्हते की ही गर्दीच आज मृत्यूचे दर्शन घेणार आहे! अवघ्या पाच मिनिटात सात स्फोट… आणि क्षणार्धात १८९ निष्पाप जीवांचे होत्याचे नव्हते झाले.
आज १९ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ऐकून काळजात पुन्हा एकदा नुसता धस्स झाला!
सर्व आरोपी निर्दोष… कोणीच जबाबदार नाही!
मग सांगाना… त्या १८९ मृतांचा खरा गुन्हेगार तरी कोण?
स्फोटांचा तो नरकसंपात…
११ जुलै २००६, सायंकाळी ६:२३ ते ६:२९ दरम्यान —
मुंबईच्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात कुकरमध्ये ठेवलेले RDX स्फोटक उडवण्यात आले.
खार, सांताक्रुझ, वांद्रे, जोगेश्वरी, माटुंगा, माहिम, बोरीवली, मीरा रोड…
सात ठिकाणी एकाच वेळी तांडव!
केईएम, सायन, नायर, जे.जे. रुग्णालयं — रक्तात न्हालेली.
शवांचा थर, हॉस्पिटलबाहेर रांग आणि घरचे लोक फक्त एकच प्रश्न विचारत होते…
“माझा बाबा कुठे आहे?” “माझी बहीण वाचली का?”
आता कोर्ट म्हणतं – आरोपी निर्दोष!
या प्रकरणात १३ आरोपींना अटक, त्यातील १२ दोषी ठरले, ५ जणांना फाशी आणि उर्वरितांना आजीवन कारावास.
आता न्यायालयानं सगळी शिक्षा रद्द करून सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं.
खंडपीठ – न्या. अनिल किलोर आणि न्या. एस.जी. चांडक यांचा निर्णय.
“पुरावा अपुरा होता, दोष सिद्ध नाही झाला…”
“मग १८९ लोकं स्वर्गात कशामुळे गेली?”
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं,
“मी ही केस फॉलो केली नाही, पण निकाल धक्कादायक आहे!
जर हे आरोपी निष्पाप होते, तर मग स्फोट कुणी केले?
हा न्याय आहे की अन्याय?”
राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे… पण ते ही आता उशीराचं नाही का?
राजकारण, तपास आणि संभ्रम
तपासानुसार पाकिस्तानमधील ISI आणि लष्कर-ए-तैयबा यांचा हात असल्याचं सांगण्यात आलं होतं.
SIMI आणि Indian Mujahideen यांचे दावे-प्रतिदावे.
आरोपींच्या वकिलांनी कोर्टात दाखवलेले तपासातील त्रुटी…
काहींच्या कबुलजाबावर अवलंबून संपूर्ण केस लटकवली गेली.
१८ वर्ष तुरुंगात… आणि आता “तुम्ही मोकळे आहात”
इतकी वर्षं तुरुंगात घालवलेल्या आरोपींचा आता काय?
कोण भरपाई देणार त्या मृतांच्या परिवाराला?
दु:खात खितपत नशिबाला दोष देणाऱ्या त्या विधवा, ती अनाथ मुलं, ते वृद्ध आईवडील आजही फक्त विचारतात –
“न्याय कधी मिळणार… का नाहीच मिळणार?”
११ जुलै विसरता येईल?
नाही… विसरणं नाही, कारण ही फक्त एक घटना नव्हे, ही मुंबईच्या काळजावरचा कायमचा ओरखडा आहे.
पण आज तोच काळजाच म्हणतोय – “आमचं रक्त वाहिलं, पण दोषीच नव्हता?”