
दौंड प्रतिनिधी
राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) मातृसंस्थेच्या प्राचार्यपदी प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदाचा बहुमान वरिष्ठ अधिकारी जयश्री देसाई यांना प्राप्त झाला आहे.
या केंद्राचे माजी प्राचार्य व दोन वेळा राष्ट्रपती पोलिस पदकप्राप्त रामचंद्र केंडे यांचा नुकताच सेवानिवृत्तीनंतर पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी जयश्री देसाई यांची नियुक्ती झाल्याने राज्य राखीव पोलिस दलाच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक
२०११ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उप अधीक्षकपदासाठी जयश्री देसाई यांनी मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रत्नागिरीत काम करत त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यांनी गंगापूर (छत्रपती संभाजीनगर), जुन्नर, सातारा येथे जात पडताळणी समितीमध्ये कार्य केले असून, नाशिक येथील पोलिस प्रबोधिनीमध्ये अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच रत्नागिरी व कोल्हापूर येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी सेवा दिली आहे.
प्रशिक्षण दर्जा उंचावण्यावर भर
जयश्री देसाई यांचा नवप्रविष्ट पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा व्यापक अनुभव असल्याने नानवीज केंद्रात प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे. “प्रशिक्षणार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत त्यांच्या क्षमतेनुसार दर्जेदार प्रशिक्षण देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ७८४ प्रशिक्षणार्थी, ५७ निदेशक प्रशिक्षणात
सध्या नानवीज केंद्रात सत्र क्र. ६९ व ७० अंतर्गत एकूण ७८४ जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय ५७ जिल्हा कवायत निदेशकांनाही येथे प्रशिक्षण सुरू आहे.
राज्यातील १९ एसआरपीएफ गटांसाठी महत्त्वाचे केंद्र
१९८८ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्रास २०१० मध्ये स्वतंत्र आस्थापनेचा दर्जा देण्यात आला. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, गोंदिया, नवी मुंबई, जालना, हिंगोली, वडसा, काटोल, छत्रपती संभाजीनगर आदी १९ एसआरपीएफ गटांत भरती झालेल्या जवानांना नऊ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण येथे दिले जाते.
या प्रशिक्षणात पारंपरिक प्रशिक्षणाबरोबरच भारतीय लष्कर व निमलष्करी दलांच्या धर्तीवर मूलभूत कमांडो कोर्स, नवीन कायद्यांचे शिक्षण, आणि आधुनिक शस्त्रांची हाताळणी यांवर विशेष भर दिला जातो.
जयश्री देसाई यांच्या नियुक्तीमुळे राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण व्यवस्थेत नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.