
सांगली प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ढालगाव रस्त्यालगत राहणाऱ्या पाटील कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण घटनेत सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला असून, बाप-लेक गंभीर अवस्थेत आहेत.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडवली आहे. मृत महिलांची नावे रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) आणि काजल समीर पाटील (वय ३०) अशी आहेत. तर अल्लाउद्दीन पाटील आणि त्यांचा मुलगा समीर पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाटील कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गावात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. शेती व्यवसाय करणाऱ्या अल्लाउद्दीन पाटील यांच्या कुटुंबाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याची चर्चा सर्वत्र होत आहे.
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारामुळे नांगोळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.