
सातारा प्रतिनिधी
सातारा : मोटारसायकल चोरट्याला पकडण्यासाठी उंब्रज परिसरात सापळा रचणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि उंब्रज पोलिसांनी एका इसमाला चोरीच्या मोटारसायकलसह पकडले. या कारवाईदरम्यान आरोपीकडे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत प्रतिबंधित असलेले Indian Black Turtle (कासव) देखील जप्त करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी पाटण-तिकाटणे ते चाफळ रोडवर एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन उंब्रज बाजूकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. चाफळ फाटा परिसरात हॉटेल मैत्री पार्कजवळ संशयिताला पकडण्यात आले. चौकशीत त्याने मोटारसायकल सातारा एमआयडीसी येथून चोरल्याची कबुली दिली.
दरम्यान, मोटारसायकलच्या हँडेलला बांधलेल्या पिशवीत हालचाल दिसून आल्याने तपासणी केली असता त्यात कासवासदृश वन्यजीव आढळला. विचारल्यानंतर संशयिताने तो नदीत मिळाल्याचे आणि विक्रीसाठी ठेवल्याचे सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कासव जप्त करण्यात आले असून, आरोपीवर Indian Wildlife Protection Act, 1972 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जप्त केलेले कासव हे Indian Black Turtle नावाने ओळखले जाते आणि ते शेड्यूल-१ अंतर्गत संरक्षित प्रजाती आहे. चोरीच्या मोटारसायकलप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हाही उघडकीस आणण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रोहित फार्णे, उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र भोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलिस वरिष्ठांनी कौतुक केले.