
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांवर चाकूचा धाक दाखवत मारहाण करून सोन्याचे दागिने लुटल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडवली आहे. उंब्रज येथील अंधारवाडी रस्ता व शिवडे फाटा येथील सेवा रस्त्यावर घडलेल्या या घटनांमध्ये सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे सहा लाख ८० हजार रुपये किमतीचे लंपास करण्यात आले.
तथापि, पोलिसांनी या घटनेत सध्या तीन लाख रुपयांचीच नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. या घटना आज गुरुवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडल्या.
पहिली घटना उंब्रज-अंधारवाडी रस्त्यावर घडली. मनीषा शहाजी कदम (वय ४५, रा. उंब्रज) आणि त्यांच्या मैत्रिणी रोहिणी साळुंखे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असता, तीन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवर येत चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याकडील २ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून आरोपी फरार झाले. आरडाओरड करत असताना मनीषा कदम यांच्या हाताच्या अंगठ्याला चाकू लागल्याची माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे.
दुसरी घटना याचवेळी उंब्रज-शिवडे सेवा रस्त्यावर घडली. अपूर्वा अर्जुगडे आणि त्यांची सासू सुनीता अर्जुगडे मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या असता, तिथेही तिघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून साडेपाच तोळ्यांचे गंठण हिसकावले.
दोन्ही घटनांनंतर महिलांनी तत्काळ उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, तपासाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे करत आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.