
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | लोकप्रिय अभिनेता सोनू सूद यांच्या जुहू-विलेपार्ले येथील आलिशान निवासस्थानी आज सकाळी धामण जातीचा साप दिसून आल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. घरातील कर्मचाऱ्यांना साप दिसताच त्यांनी तत्काळ मदतीसाठी सर्पमित्रांशी संपर्क साधला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा साप धामण (Rat Snake) जातीचा असून तो पूर्णपणे निरुपद्रवी आहे. मात्र, सापाची अचानक उपस्थिती पाहून घरातील कर्मचाऱ्यांनी घाबरून त्वरित स्थानिक सर्पमित्र विकी दुबे यांना पाचारण केले. विकी दुबे यांनी घटनास्थळी धाव घेत व्यावसायिक पद्धतीने सापाला सुरक्षितपणे पकडले.
यानंतर सापाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत सापाला किंवा कोणालाही कोणतीही इजा झाली नाही. सोनू सूद यांनीही या वेळी सर्पमित्रांच्या कामगिरीचे कौतुक करत वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
पावसाळ्याच्या दिवसात सापांचे हालचाली वाढतात आणि ते अनेकदा घरात किंवा परिसरात शिरतात. त्यामुळे नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता त्वरित तज्ज्ञांना बोलवावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
साप आढळल्यास काय करावे?
घाबरून न जाता सापापासून सुरक्षित अंतर ठेवा
त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका
त्वरित स्थानिक सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधा
मुंबईसारख्या शहरी भागात सापांचे दर्शन ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. मानवी वस्ती वाढल्यामुळे त्यांचा अधिवास कमी होतो आणि ते अन्न व आसऱ्याच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.