
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील पोलीस सेवेत रुजू होण्याची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठी बातमी! राज्यात तब्बल ११ हजार पोलीस पदांची भरती लवकरच होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील अंतिम आठवड्यातील प्रस्तावावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
“पोलीस भरतीसाठी गृह विभागाकडून आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२५ पासून भरती प्रक्रियेचा प्रारंभ होईल,” असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारो इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या.
मागील तीन वर्षांत ३८,८०२ पोलीस भरती
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, मागील तीन वर्षांमध्ये ३८ हजार ८०२ पदांसाठी पोलीस भरती पार पडली आहे, आणि या पार्श्वभूमीवरच आता नव्याने आणखी ११ हजार भरती केली जाणार आहे.
भरती प्रक्रिया कशी असेल?
या भरती प्रक्रियेत सर्वप्रथम मैदानी चाचणी होणार असून त्यानंतर मुंबई वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये बँड पथकातील कर्मचारी, चालक शिपाई, सामान्य पोलीस शिपाई, तसेच राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार पदांचा समावेश असणार आहे.
उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतील आणि तो जिल्हा त्यांचा मूळ रहिवासी जिल्हा असणे आवश्यक आहे.
विरोधकांवर फडणवीसांचे टोले
अंतिम आठवड्यातील प्रस्तावावरील चर्चेत ३० सदस्यांनी भाग घेतल्याचे सांगत, फडणवीसांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
“विरोधकांनी किती खात्यांवर चर्चा करावी याचे नियोजनच केले नाही. प्रस्ताव मांडला तरी न्याय मिळत नाही, अशीच परिस्थिती दिसते,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राज्यभरातील तरुणांना नवसंजीवनी देणारी ही घोषणा आता पोलीस खात्यात भरतीसाठी सज्ज असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.