
मुंबई प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि क्रांतिकारी बदल — तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता ओटीपीद्वारे आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. १५ जुलैपासून ही नवी प्रणाली संपूर्ण देशभर लागू करण्यात आली असून, आयआरसीटीसीच्या वेबसाइट, मोबाईल अॅप आणि पीआरएस काउंटरवरून तिकीट बुक करताना याच नियमाचे पालन करावे लागणार आहे.
उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक उचित सिंघल यांनी ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “प्रवाशांच्या हितासाठी व तात्काळ तिकीटांची पारदर्शकता राखण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक ठरवण्यात आली आहे. खरे प्रवासीच या सुविधेचा लाभ घ्यावा, यासाठीच ही पावले उचलली आहेत.”
* मोबाईलशी आधार लिंक आवश्यक
तिकीट बुक करताना प्रवाशाने आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल फोन जवळ ठेवणे आवश्यक ठरणार आहे. कारण तिकीट बुकिंगच्या क्षणी त्या मोबाइलवरच ओटीपी पाठवला जाणार असून, तो ओटीपी दिल्याशिवाय बुकिंग पुढे सरकणार नाही.
* एजंटांवर नियंत्रण
रेल्वे प्रशासनाने एजंटांच्या मनमानी बुकिंगवर लगाम घालण्यासाठी अजून एक महत्त्वाची घोषणा केली आहे — बुकिंग विंडो सुरू झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत अधिकृत एजंट तात्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत.
* एसी वर्गासाठी सकाळी १० ते १०:३० पर्यंत
* नॉन-एसी वर्गासाठी सकाळी ११ ते ११:३० पर्यंत
ही निर्बंधाची वेळ लागू असेल.
प्रवाशांना सूचना
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्पष्ट सूचना दिली आहे की, त्यांनी तिकीट बुकिंगपूर्वी त्यांच्या आयआरसीटीसी प्रोफाइलमध्ये आधार क्रमांक अद्ययावत केला आहे ना, याची खात्री करावी. अन्यथा तात्काळ तिकिटासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तात्काळ तिकीट म्हणजे वेग, पण आता ते पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीनं! प्रवाशांना सुसूत्र सेवा देण्यासाठी रेल्वेचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.