
पंढरपूर प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या जळालेल्या मृतदेहाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडवून दिली होती. घरासमोरील गवताच्या गंजीत सापडलेला मृतदेह पाहून घरातील विवाहितेने आत्महत्या केल्याचे समजले. पण सत्य काही औरच होते! पोलिसांनी केलेल्या सूक्ष्म तपासातून एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी कट कारस्थान उघडकीस आले आहे.
या प्रकरणात ‘मृत’ समजल्या गेलेल्या किरण सावंत ही प्रत्यक्षात जिवंत असल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्या प्रियकरासह तिने बनाव रचून एका वेडसर महिलेचा खून करून तिच्या जागी स्वतःला मयत असल्याचे भासवले.
‘दीर-भावजयी’च्या बेकायदेशीर प्रेमातून जन्मले ‘हत्या कटाचे’ कटाक्ष!
पोलिस तपासात निष्पन्न झालेल्या माहितीप्रमाणे, किरण सावंत (विवाहिता) आणि तिचा दीर निशांत सावंत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते. समाजाच्या आणि कुटुंबाच्या बंधनांपासून मुक्त होण्यासाठी दोघांनी एकत्र पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण किरणच्या अस्तित्वाची कोणालाही शंका येऊ नये म्हणून आत्महत्येचा बनाव रचण्याचे ठरले.
बनावासाठी शोधली ‘वेडसर बळी’!
आठ दिवसांच्या शोधानंतर गोपाळपूरजवळ त्यांना एक वेडसर महिला सापडली, जी आपल्या मुलाच्या शोधात गावोगाव फिरत होती. निशांतने तिला मुलाला शोधून देतो, असे सांगून विश्वासात घेतले आणि पाटकळ येथे घेऊन आला.
घटनेच्या दोन दिवस आधी तिचा गळा दाबून खून करण्यात आला. घटनेच्या रात्री त्या महिलेला गवताच्या गंजीत ठेवून मृतदेहासोबत किरणचा मोबाईल ठेवल्याने सर्वांचा दिशाभूल झाली.
गवताची गंजी पेटवली, अन् नवा नाट्यपूर्ण अध्याय सुरू झाला
रात्री अडीच वाजता निशांतने गवताची गंजी पेटवली. किरणला याआधीच घराबाहेर काढून डाळिंबाच्या बागेत लपवले होते. आगीच्या ज्वाळा पाहून गावकऱ्यांनी धाव घेतली, निशांतही ‘सहाय्यक’ म्हणून उपस्थित राहिला. गंजीत महिला मृतावस्थेत आढळल्यावर सर्वांनी ही किरणची आत्महत्या असल्याचे मानले. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकरणाचा माग काढण्यात आला आणि अखेर सत्य उघडकीस आले.
मोबाईल CDRने उलगडले गुन्ह्याचे रहस्य
जळालेल्या मृतदेहाजवळ आढळलेला मोबाईल हा किरणचा असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपासले. यातून निशांत सावंतवर संशय गडद झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने खुनाची कबुली दिली. मात्र, घटनास्थळी नेल्यानंतर सत्य बाहेर आले,खून झालेली महिला किरण नव्हे, तर ती वेडसर महिला होती.
या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि विचित्र गुन्ह्याचा तपास पोलिसांनी अत्यंत हुशारीने सोडवला. निष्पाप वेडसर महिलेला क्रूरपणे बळी देणाऱ्या या ‘अवैध प्रेमकथेला’ पोलिसांच्या तत्परतेमुळे पूर्णविराम मिळाला. किरण आणि निशांतविरोधात खून, बनावट पुरावे तयार करणे आणि दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने समाजातील नैतिकतेचे, मानसिकतेचे आणि कायद्याच्या भीतीचे प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत. बेकायदेशीर संबंध, भावनांचा गैरवापर, आणि निर्दोष व्यक्तीला बळी देण्याचे हे क्रूर वास्तव काळजाचा ठाव घेणारे आहे.