
* पंतप्रधान म्हणाले – गगनयानासाठी महत्त्वाचा टप्पा, कोट्यवधींसाठी प्रेरणा
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारताचे स्वप्न साकार करत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे आज पृथ्वीवर थाटात पुनरागमन झाले. १८ दिवस अंतराळात यशस्वी मिशन पूर्ण करून ते चार देशांचे अंतराळवीरांसह ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून सुरक्षितरित्या कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले. या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण देशाला अभिमानाचा झणझणीत अनुभव दिला आहे.
#WATCH | Axiom-4 Mission | Lucknow | On Group Captain Shubhanshu Shukla piloted Axiom 4 returns to Earth, his mother Asha Shukla says, "Excitement is endless and we are very proud. We were afraid at first… The upcoming generation should take inspiration and move ahead as… pic.twitter.com/bQPGAK6eO5
— ANI (@ANI) July 15, 2025
२३ तासांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर पुनरागमन
२५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरहून फाल्कन ९ रॉकेटद्वारे सुरू झालेल्या या मोहिमेने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या अंतराळवीरांसोबत विविध शास्त्रीय प्रयोग पूर्ण केले. नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त मोहिमेतील हे महत्त्वाचे यश गगनयानासाठी महत्त्वपूर्ण पायरी ठरते आहे.
आईच्या डोळ्यात अश्रू, वडिलांचा अभिमान
शुभांशूंच्या घरी सध्या आनंदोत्सवाचे वातावरण आहे. त्यांचे वडील म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा आहे.” त्यांच्या आईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. बहीण शुची मिश्रा म्हणाल्या, “भाऊ परत आला, ही भावना शब्दांत सांगता येणार नाही. हा खऱ्या अर्थाने देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत म्हटले, “शुभांशूचे पृथ्वीवर स्वागत! कोट्यवधी भारतीयांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरला आहे. हे यश गगनयान मिशनच्या दिशेने मैलाचा दगड आहे.”
अंतराळ क्षेत्रात भारताची झेप अधिक भक्कम करत, शुभांशू शुक्ला यांनी देशाच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. देशवासीयांच्या उरात गर्व आणि प्रेरणेची ज्योत चेतवणारा हा क्षण इतिहासात अजरामर होणार यात शंका नाही.