
मुंबई : मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. दादर येथील 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यांना आणि विश्वस्तांना सात दिवसांमध्ये मंदिर हटवण्यास सांगण्यात आले होते, तशी नोटीस पाठवण्यात आली. रेल्वेकडून ही नोटीस देण्यात आली होती. काल पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका या मुद्दावरून केली. दुसरीकडे आज संध्याकाळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात महाआरती होणार होती. मात्र, त्यापूर्वीच मंदिराच्या नोटीसला थेट स्थगिती देण्यात आली आणि मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपच्या लोकांनी दादर येथील हनुमान मंदिरात जाऊन थोडे नाटक केले. त्यानंतर या नोटीसीला हाताने पत्र लिहून स्थगिती देण्यात आली. म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. आम्ही सायंकाळी साडे पाचला हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही काल जे काही केले, त्यानंतर भाजपचे दुतोंडी आणि निवडणुकीपुरतेचे हिंदुत्व उघडे पडले. निवडणुकीसाठी हिंदुंना वापरले जाते. निवडणुका झाल्यानंतर यांच्याच राज्यात आमची मंदिरे सुरक्षित नसतात, त्यात हे हनुमानाचे मंदिर होते, असे त्यांनी म्हटले.
तसेच मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळाप्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करत आहे. खोके सरकारच्या देखरेखीत मोठा घोटाळा झाला आहे. आता फडणवीसांचे सरकार आले आहे, त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे, त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचे असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की या सर्वामध्ये त्यांचा हात नाही, आणि ठेकेदाराचा फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून बाजुला ठेवावे तर आणि तरच आम्ही समजू की हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही, असेही त्यांनी म्हटले.