
जळगाव प्रतिनिधी
कायदा क्षेत्रात देशभरात आपल्या कसबाने परिचित असलेले विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून भाजपचे तिसरे खासदार संसदेत पोहोचले असून, निकम यांचा राजकीय प्रवास नव्या वळणावर पोहोचला आहे.
निकम कुटुंबाचा सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील सखोल वारसा लाभलेला आहे. चोपडा तालुक्यातील माचला हे त्यांचे मूळ गाव असून, तेथे सुमारे २०० एकर शेती त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या वडिलांनी जळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.
बॅरिस्टर देवराव निकम यांचा सहकारात मोठा ठसा
बॅरिस्टर देवराव निकम हे केवळ विधिज्ञ नव्हते, तर जळगाव जिल्ह्यातील सहकार चळवळीचे मार्गदर्शक नेते होते. त्यांनी राज्यात सहकार प्रशिक्षण केंद्रांची मुहूर्तमेढ रोवली होती. जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या अध्यक्षपदासह, १९६२ ते १९६७ या काळात ते चोपडा तालुक्याचे आमदारही राहिले होते.
परंपरा पुढे नेणारे वारसदार
बॅरिस्टर निकम यांचे ज्येष्ठ पुत्र दिलीप निकम यांनीही सहकार क्षेत्रात सक्रीय कामगिरी बजावली. त्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्षपद भूषवले, तर त्यांच्या पत्नी शैलजा निकम या जिल्हा परिषद सदस्य, कृभकोच्या संचालक आणि सध्या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत.
निकम कुटुंबाची तिसरी पिढीही सहकारात सक्रीय झाली आहे. रोहित दिलीप निकम हे राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष, कॉटन फेडरेशन व जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत.
अद्वितीय वकिली कारकीर्द आणि आता संसदेत प्रवेश
विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांनी मुंबई आतंकवादी हल्ला, १९९३ बॉम्बस्फोट, प्रशांत सुतार हत्या, बिल्कीस बानो बलात्कार अशा अनेक उच्चपातळीवरील खटल्यांत प्रभावी भूमिका बजावली. त्यांच्या न्यायालयीन कामगिरीने त्यांना देशात मानाचे स्थान मिळवून दिले.
राजकीय पक्षांनी त्यांच्या प्रभावी प्रतिमेकडे बघून प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्यावर डोळा ठेवला होता, मात्र त्यांनी त्या काळात कोणत्याही पक्षात प्रवेश नाकारला होता. २०१९ मध्ये भाजपने त्यांना उत्तर-मध्य मुंबईमधून लोकसभा उमेदवारी दिली होती, मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते पुन्हा कायदाक्षेत्रात रमले.
आता त्यांची थेट राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने ॲड. निकम यांचा राजकीय प्रवास पुन्हा एकदा तेजीत आला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्येही नवसंजीवनी निर्माण झाली आहे. भाजपसाठी हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा मानला जात आहे.