
मुंबई प्रतिनिधी
ठाणे शहर आणि जिल्ह्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी! महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत तब्बल 5,285 सदनिकांची आणि 77 भूखंडांची संगणकीय सोडत जाहीर करण्यात आली आहे.
ही सोडत ठाणे, वसई (जि. पालघर), कुळगाव-बदलापूर आणि सिंधुदुर्गातील ओरोससह विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत सोमवार, 14 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजिव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ऑनलाइन नोंदणी व अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
5 गटांमध्ये विभागलेली घरांची योजना
कोकण मंडळाने यंदाच्या सोडतीसाठी विविध योजनांतर्गत सदनिकांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे –
* 20% सर्वसमावेशक योजना – 565 सदनिका
* 15% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – 3,002 सदनिका
* म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका – 1,677 सदनिका
* 50% परवडणाऱ्या सदनिका – 41 सदनिका
* एकूण भूखंड – 77
अर्जाची अंतिम मुदत
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 अशी असून, अनामत रक्कम भरायची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2025 अशी आहे. अर्जांची प्राथमिक यादी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
दावे-हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट, 2025, तर अंतिम पात्र अर्जांची यादी 1 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
संगणकीय सोडत 3 सप्टेंबर रोजी
3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. पात्र अर्जदारांना निकाल SMS, ई-मेल तसेच मोबाईल अॅप द्वारे तात्काळ कळवण्यात येईल.
अर्जाची प्रक्रिया मोबाईलवर
म्हाडाने यंदा IHLMS 2.0 संगणकीय प्रणाली आणि मोबाईल ऍपद्वारे (Android/ iOS) अर्ज सुलभ केले आहेत. अर्ज भरण्यासाठी व मार्गदर्शनासाठी https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहितीपुस्तिका, व्हिडीओ मार्गदर्शन, हेल्प फाईल्स आणि हेल्प साईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेल्पलाइन नंबर: 022-69468100
दलालांपासून सावध!
कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, म्हाडाने कोणत्याही एजंट, सल्लागार किंवा प्रतिनिधीची नेमणूक केलेली नाही. ही संपूर्ण सोडत प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक असून, मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही दलालाच्या अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता फक्त एक क्लिक दूर आहे!
14 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू – संधी गमावू नका!