
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पाहणी; ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश
मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव या दरम्यान उभारल्या जाणाऱ्या *‘मिसिंग लिंक प्रकल्पा’*मुळे प्रवासात तब्बल ३० मिनिटांची बचत होणार असून, हे काम येत्या ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी केली. वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासाच्या वेळेने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हा प्रकल्प म्हणजे दिलासा देणारी योजना ठरणार आहे.
जगातील सर्वात रुंद बोगदा – २३ मीटर रूंदी
या प्रकल्पात जगातील सर्वाधिक रुंद बोगद्याचा (२३ मीटर) समावेश असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हा मार्ग बांधण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “समृद्धी महामार्गावरील देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचा विक्रम आता मिसिंग लिंक प्रकल्प मोडणार आहे.”
प्रवासाचा मार्ग कमी, वेळेत बचत
या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर ६ किमीने कमी होणार असून, प्रवासाचा कालावधी सरासरी ३० मिनिटांनी कमी होईल. विशेष म्हणजे, पुणेकरांना नव्याने विकसित होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एक तास लागणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकीचे मोठे आव्हान
या प्रकल्पात अत्याधुनिक इंजिनिअरिंग कौशल्य वापरले जात असून, परिसरातील उंची, हवामान आणि वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन संपूर्ण रचना उभी केली जात आहे. टायगर व्हॅलीच्या १३२ मीटर उंचीवर असलेला ६४० मीटर लांबीचा केबल स्टेड पूल, तसेच ८.९२ किमी व १.७५ किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे, हा प्रकल्प अभियांत्रिकी दृष्टिकोनातून एक मास्टरपीस ठरणार आहे.
मुदतवाढीनंतर वेगात काम
२०१९ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पास काही अडचणींमुळे वेळोवेळी मुदतवाढ मिळाली होती. मात्र आता दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षणानंतर यंत्रणांना वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या ‘मिसिंग लिंक’मुळे केवळ प्रवासाचा वेळच नव्हे, तर मुंबई-पुणे दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलणार आहे. राज्याच्या पायाभूत सुविधा विकासात ही एक सुवर्णपानेत नोंदवण्याजोगी कामगिरी ठरणार आहे, यात शंका नाही.