
मीरा-भाईंदर प्रतिनिधी
मराठी अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ अधिकारी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आजच कार्यभार स्वीकारला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या निर्णयानंतर आणि मराठी कार्यकर्त्यांच्या मध्यरात्रीच्या धरपकडीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आरोप होत आहेत की, सरकारच्या दबावाखाली पांडे यांनी ही कारवाई केली होती.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर राज्य सरकारने पांडेंना बाजूला सारत निकेत कौशिक यांच्यावर विश्वास दाखवला आहे. कौशिक यांच्याकडून काय धोरणात्मक बदल होतील, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी अस्मितेचा प्रचंड एल्गार
मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मध्यरात्री कार्यकर्त्यांना नोटिसा देणे, काहींना ताब्यात घेणे आणि मोर्चाला अधिकृत परवानगी न देणे — हे सगळं असूनही मराठी जनतेने अभूतपूर्व पद्धतीने प्रतिसाद दिला.
हा मोर्चा रस्त्यावर उतरल्यानंतर अक्षरशः रुद्रावतार धारण करत, तब्बल पाच तास मराठी अस्मितेचा एल्गार घुमवला. “महाराष्ट्रद्वेष्ट्या महायुती सरकारला हे कळू द्या, मराठी माणूस आता गप्प बसणार नाही,” असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.
पोलिसांनी टाकलेल्या बंदोबस्ताचं जाळं फोडत मराठी बांधव रस्त्यावर उतरले. “मराठी माणसाला डिवचणाऱ्यांना आम्ही उत्तर देऊच,” अशा घोषणा देत हे आंदोलन एका मोठ्या जनसैलाबात परावर्तित झाले.
राजकीय भूकंपाचे संकेत?
या संपूर्ण घडामोडींनी राज्याच्या राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण केला आहे. मराठी जनतेच्या उद्रेकामुळे महायुती सरकारच्या भूमिकेवर टीकेची झोड उठली आहे. एकीकडे ‘मराठी माणसावर अन्याय’ हे चित्र निर्माण झाले असून, दुसरीकडे पोलिसांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, यानंतर महायुती सरकारला मराठी अस्मितेच्या मुद्यावर अधिक दबावाला सामोरे जावे लागू शकते.