
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील विनाअनुदानित खासगी शाळांतील शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेत 20 टक्के वाढीव पगार लवकरच शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी खुद्द आझाद मैदानावर उपस्थित राहून ही घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, “पावसाळी अधिवेशन 18 जुलै रोजी संपल्यानंतर लगेचच वाढीव पगाराचा हप्ता शिक्षकांच्या खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. यापुढे पगाराच्या अदा करण्यात कोणतीही विलंब होणार नाही.”
दरम्यान, या आंदोलनात सहभागी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली असून ही चर्चा सकारात्मक झाल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं. याआधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात येऊन आंदोलक शिक्षकांशी संवाद साधला होता.
शिक्षकांच्या काय होत्या प्रमुख मागण्या?
राज्यात सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मध्ये झालेला असला तरी प्रत्यक्षात अजून कोणत्याही शाळेला निधी मिळालेला नव्हता. सरकारकडून निधीअभावी पुरवणी मागणीही अधिवेशनात मांडण्यात आलेली नव्हती.
या निष्क्रियतेच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षकांनी 8 आणि 9 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेत आंदोलन सुरू केलं.
राज्यभरातील शिक्षकांचा आकडा मोठा
सध्या राज्यात 5,844 अंशतः अनुदानित शाळा कार्यरत असून त्यात 8,602 प्राथमिक, 24,028 माध्यमिक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. या सगळ्यांचा प्रश्न प्रलंबित होता.
सरकारचा ठोस शब्द
गिरीश महाजन म्हणाले, “काही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे अडचणी आल्या होत्या, पण आता आम्ही शिक्षकांच्या मागण्या मान्य करत आहोत. पुढील काळात पगाराची तारीख टळणार नाही आणि वेळेत वेतन मिळणार याची हमी देतो.”
या घोषणेमुळे आंदोलनकर्त्या शिक्षकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मात्र निधी प्रत्यक्ष खात्यावर जमा होईपर्यंत शिक्षकांचा संयमाचा कस लागणार हे नक्की!