मुंबई प्रतिनिधी
विधानभवनात पावसाळी अधिवेशन रंगत असतानाच शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी अर्थमंत्री अजित पवारांवर निधी वाटपाच्या मुद्द्यावरून थेट आणि संतप्त हल्ला चढवला. “बोलून काय होणार? निधी देणार नाहीत, आणि ते तसाही दिला जात नाही,” असा संतापजनक टोला लगावत जाधवांनी अर्थसंकल्प, निधी, शेतकरी, पोलीस कार्यक्षमता अशा विविध मुद्द्यांवर सरकारची कानउघाडणी केली.
निधीच्या अन्यायावरून अजितदादांवर घणाघात
“अर्थमंत्री कोणाला किती निधी द्यायचा हे एकटेच कसे ठरवू शकतात?” असा थेट सवाल उपस्थित करत जाधवांनी सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधलं. “मी गुहागरमध्ये छत्रपतींचा पुतळा उभारण्यासाठी 10 कोटी मागितले होते, पण अजितदादांनी साधा होकारही दिला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“राज्याचा ७.७५ लाख कोटींचा अर्थसंकल्प जाहीर झाला. पण अजूनही ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या समोर आल्या आहेत. राज्याच्या तिजोरीवर वाढतं कर्ज, वाढत्या तुटीचा अर्थसंकल्प, आणि तरीही निधीवाटपात पक्षीय निवड हे गंभीर आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
“भाजप-शिवसेना सगळेच नाराज”
“भाजप आमदार गृहमंत्री अमित शाहांपर्यंत तक्रारी घेऊन जातात, शिंदे गटाचे आमदार उपमुख्यमंत्री शिंदेंकडे न्याय मागतात. मग आम्ही काही वेगळे काय करतोय?” असा सवाल करत त्यांनी संपूर्ण महायुतीतील असंतोष अधोरेखित केला. “हे अर्थखाते एकाच माणसाच्या मनमानीवर चालणारं नाही,” असा खवळलेला सूरही त्यांनी घेतला.
राणेंवर फटकारा — “शिव्या देऊन मुख्यमंत्रीपद मिळणार नाही!”
भास्कर जाधव यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनाही लक्ष्य केलं. “लोकांना शिव्या देता आणि मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवता. त्याऐवजी ड्रेनेजसाठी हट्ट करा, कोकणाला मदत करा,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. “ही लहानाची मोठी झालेली मंडळी आता मोठ्ठीच झालीत,” असं म्हणत त्यांनी राजकीय अनुभवाच्या तुलनेचा चिमटा काढला.
पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप
“माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न झाला. गाडीची काच फोडली गेली, पण मुख्यमंत्र्यांनी साधं उत्तरही दिलं नाही. पोलिसांची कार्यशैली एवढी ढिसाळ झाली आहे की, आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात जातो आणि तरीही पथकं पाठवली जातात,” अशी गंभीर टीका करत त्यांनी पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“अक्षय शिंदेसाठी 10 पथकं, वाल्मिक मुंडेसाठी 50 पथकं… ही पथकं पोलीस यंत्रणा आहेत की बँड पार्टी?” असा उपरोधक सवालही त्यांनी केला.
भास्कर जाधव यांचा या आक्रमक भाषणाने सभागृहात खळबळ उडाली असून निधीवाटपातील पक्षीय राजकारण, सरकारी अनास्था आणि सुरक्षेच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.


