
बिंजिंग
चीनच्या नैऋत्य सिचुआन प्रांतात शनिवारी आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे संपूर्ण भागाला हादरवून सोडणारे विध्वंसक दृश्य पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या चिखलाच्या प्रचंड प्रवाहाने डझनभर घरे वाहून गेली, रस्ते बंद झाले, पूल कोसळले आणि संपूर्ण दळणवळण ठप्प झाले आहे. या भयानक स्थितीमुळे अनेक कुटुंबांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले असून, शेकडो नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
‼️🚨⚡️China: Mudflows destroy homes in Sichuan Province due to severe flooding. pic.twitter.com/IKUPoHOMPu
— 🇷🇺MOSCOW NEWS | ENGLISH (@MOSCOW_EN) July 5, 2025
सिचुआनमधील याआन व मीशान शहरांमध्ये ही भीषण आपत्ती घडली. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वतीय भागातून आलेल्या चिखलप्रवाहाने क्षणार्धात खालच्या वस्त्यांवर हल्ला चढवत घरे आणि रस्ते जमीनदोस्त केले. या प्रचंड प्रवाहामुळे वाहतुकीची साधने नष्ट झाली असून, संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
आपत्कालीन पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून, शेकडो जवान मदत व बचाव कार्यात गुंतले आहेत. अद्याप कोणत्याही मृत्यूची अधिकृत नोंद झाली नसली तरी अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी विशेष शोधपथक घटनास्थळी दाखल झाली आहेत.
दरम्यान, पुरामुळे अनेक भागांचा वीज आणि पाणीपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. नागरिकांना अन्न व पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीची मोहीम हाती घेतली आहे.
या संपूर्ण हृदयद्रावक दृश्याचा व्हिडिओ मॉस्को न्यूज ऑन एक्स या माध्यमाने शेअर केला असून, सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीनं संपूर्ण चीन हादरला असून, सिचुआनमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.