
वृत्तसंस्था
फ्रेंच ओपन २०२५ स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद अमेरिकेच्या कोको गॉफने जिंकले आहे. अफलातून पुनरागमन करत तिने अव्वल मानांकित अरिना सबलेंकाला अंतिम सामन्यात मात देत दुसरे ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले.
२१ वर्षांच्या कोको गॉफचे हे एकेरीतील पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद आहे.
अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित गॉफने सबलेंकाला ६-७, ६-२,६-४ अशा तीन सेटमध्ये पराभूत करत हे विजेतेपद जिंकले. पहिल्या सेटमध्ये सबलेंकाने ४-१ अशी आघाडी घेतली होती. पण गॉफनेही झुंज दिली. हा सेट गॉफने टाय ब्रेकमध्ये गमावला. पहिला सेट तब्बल १ तास १७ मिनिटे चालला.
THE Moment ✨#RolandGarros pic.twitter.com/vlPH9rQwqi
— Roland-Garros (@rolandgarros) June 7, 2025
पण नंतर गॉफने अफलातून पुनरागमन करत दुसरा सेट सहज जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोघी एकमेकींना टक्कर देत होत्या. यादरम्यान सबलेंकाने एक मॅच पाँइंटही वाचवला. पण गॉफने अखेरची लढाई जिंकली आणि फ्रेंच ओपन विजेतेपदावर नाव कोरले.
कोको गॉफने यापूर्वी २०२३ मध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद जिंकले आहे. तसेच गॉफचा हा सबलेंकाविरुद्धचा ११ सामन्यांतील ६ वा विजय होता. याशिवाय सेरेना विल्यम्सनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिला अमेरिकन महिला टेनिसपटू आहे.
सेरेनाने शेवटचे फ्रेंच ओपन २०१५ साली जिंकले होते. याशिवाय सेरेना विल्यम्सने पहिल्यांदा २००२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी गॉफ सर्वात युवा अमेरिकन टेनिसपटूही आहे.
दरम्यान, गॉफने जरी हे विजेतेपद मिळवले असले तरी ती जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिल. तिला २००० पाँइंट्स या विजेतेपदानंतर मिळाले आहेत. तसेच गॉफला २,५५०,००० युरो (जवळपास २४.९४ कोटी) बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
सबलेंका या उपविजेतेपदानंतरही पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. उपविजेतेपदाबद्दल तिला बक्षीस म्हणून १,२७५,००० युरो (जवळपास १२.४७ कोटी) मिळाले आहेत.