मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच महागाई भत्त्याच्या (DA) वाढीचा दिलासा मिळण्याची शक्यता असून, जुलै महिन्याच्या पगारासोबतच या वाढीचा लाभ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही दोन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना ५३ टक्के दराने DA दिला जात आहे. मात्र जानेवारी २०२५ पासून केंद्र सरकारने दोन टक्क्यांची वाढ करत DA ५५ टक्क्यांवर नेला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांचा DA वाढवला आहे. मात्र महाराष्ट्रातील कर्मचारी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले असून, या अधिवेशनातच DA वाढीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचारी संघटनांनी यासंदर्भात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
जुलैच्या पगारातच मिळणार वाढीव DA?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार लवकरच DA मध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर करू शकते. ही वाढ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून, जानेवारी ते जून २०२५ या कालावधीतील फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
म्हणजेच, जुलै महिन्याचा पगार आणि मागील सहा महिन्यांचा DA फरक एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. हे निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठे दिलासादायक पाऊल ठरणार आहे.
अधिकृत घोषणेकडे लक्ष
तथापि, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल का, याकडे राज्यातील सुमारे २० लाखांहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर:
सध्या DA 53%, वाढीनंतर होणार 55%
वाढीची अंमलबजावणी होणार जानेवारी 2025 पासून
जुलैच्या पगारात वाढीव DA व मागील फरक मिळण्याची शक्यता
निर्णय पावसाळी अधिवेशनात होण्याची शक्यता
राज्य सरकारने जर हा निर्णय घेतला, तर ही वर्षभरात कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता ठरेल, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. आता सरकार कधी घोषणा करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


