
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक जवळपास एक वर्षांपासून प्रलंबित असताना, आता या पदासाठी पहिल्यांदाच एका महिलेची निवड होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पातळीवर यासंदर्भात हालचालींना वेग आला असून, संघाने देखील या भूमिकेस हिरवा कंदील दिल्याची माहिती देशपातळीवरील माध्यमांकडून समोर आली आहे.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्येच संपुष्टात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षाची निवड होणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यासाठी तीन महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
निर्मला सितारामण – सर्वाधिक चर्चेतले नाव
विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर मानले जात आहे. नुकतीच त्यांनी जे. पी. नड्डा आणि बी. एल. संतोष यांच्यासोबत पक्ष मुख्यालयात महत्वपूर्ण चर्चा केली होती. संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री अशा जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळलेल्या सितारामण यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीमुळे भाजपचा दक्षिण भारतातील प्रभाव वाढू शकतो, असे मानले जात आहे.
डी. पुरनदेश्वरी – अनुभव आणि भाषिक वैविध्य लाभदायक?
आंध्र प्रदेश भाजपच्या माजी अध्यक्ष आणि सध्या सक्रिय नेत्या असलेल्या डी. पुरनदेश्वरी यांचेही नाव रेसमध्ये आहे. विविध भाषांवर प्रभुत्व आणि पक्षातील दीर्घ अनुभव यामुळे त्यांच्याकडे देखील भाजप गांभीर्याने पाहत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
वनथी श्रीनिवासन – तळागाळातील कामाचा भक्कम पाया
तामिळनाडूतील कोईम्बतूर विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार असलेल्या वनथी श्रीनिवासन यांनी 1993 पासून भाजपमध्ये कार्यरत राहत, महिला मोर्चा अध्यक्षपदी आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यपदी यशस्वी कामगिरी बजावली आहे. दक्षिणेतील संघटनात्मक मजबुती आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद हे त्यांचे बलस्थान मानले जाते.
महिलांचा पक्षाकडे वाढता ओढा, संघाकडून संकेत
गेल्या काही निवडणुकांत महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीसह विविध राज्यांतील मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या वाढल्याने, महिला नेतृत्वाची गरज अधिक भासू लागली आहे. हा बदल लक्षात घेऊनच आरएसएसकडून महिला अध्यक्षासाठी सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती आहे.
अंतिम निर्णय लवकरच?
सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता, भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. इतिहासात प्रथमच एका महिलेला पक्षाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी मिळाल्यास, तो एक ऐतिहासिक टप्पा ठरेल यात शंका नाही भाजपच्या नेतृत्वात सशक्त महिला चेहरा उभा राहत असताना, यामुळे पक्षाच्या नव्या धोरणात्मक दिशा आणि आगामी विधानसभा निवडणुकांतील रणनीतीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.