
मुंबई प्रतिनिधी
त्रिभाषा सूत्राबाबतचा वादग्रस्त निर्णय अखेर रद्द झाल्यानंतर राज्यात नवा राजकीय रंग चढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संयुक्त विजयी जल्लोष मेळावा होणार आहे.
या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघंही उपस्थित राहणार असून, राज्यातील मराठी जनतेला पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आणि सणासुदीच्या उत्सवात सामील होण्याचं जाहीर आवाहन करण्यात आलं आहे.
दुसरं एकत्रित पत्रक – ‘ही सुरुवात आहे…’
आज ठाकरे बंधूंनी आपलं दुसरं संयुक्त निमंत्रण जाहीर करत, “ही सुरुवात आहे…” असं म्हणत सर्व मराठी जनतेला पुन्हा एकदा या विजयी सोहळ्यात सामील होण्याचे खुले आवाहन केलं आहे.
“महाराष्ट्रात प्रत्येक माणूस मराठी बोलताना दिसावा, हीच आमची आकांक्षा आहे.” – अशा भावनिक सादेसह हे आवाहन करण्यात आलं आहे.
पहिल्या पत्रकातील भावनिक साद
कालच ठाकरे बंधूंनी पहिलं पत्रक प्रसिद्ध करत जनतेच्या विजयाचा साक्षीदार ठरण्याचं आमंत्रण दिलं होतं.
“सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं! पण कोणी? मराठी जनतेनं!
आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष केला. जल्लोषाचा दिवस आलाय, आम्ही आयोजक आहोत, पण जल्लोष तुमचाच आहे!
वाजत गाजत या, गुलाल उधळत या – आम्ही वाट बघतोय…**”
पत्रकाच्या शेवटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होती – हीदेखील एक ऐतिहासिक राजकीय घडामोड मानली जात आहे.
वरळी डोमवर तयारीला सुरुवात
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या नेत्यांनी NSCI डोम, वरळी येथे पाहणी केली.
शिवसेनेकडून – अनिल परब, आशिष चेंबुरकर, सुनील शिंदे
मनसेकडून – बाळा नांदगावर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार
संपूर्ण सभास्थळी जल्लोषमय वातावरण निर्माण करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
विजयी मेळाव्याची A ते Z माहिती
दिनांक: ५ जुलै २०२५
वेळ: सकाळी १० वाजता
स्थळ: एनएससीआय डोम, वरळी, मुंबई
उपस्थिती: उद्धव ठाकरे, राज ठाकरे
मुख्य उद्देश्य: त्रिभाषा धोरणाविरोधात यशस्वी संघर्ष आणि मराठी अस्मितेचा जल्लोष
राजकीय वर्तुळात खळबळ
या मेळाव्यामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत असल्याची प्रत्यक्ष झलक या कार्यक्रमात दिसणार, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड!
यावे
जागराला यावे…
@Dev_Fadnavis
@AmitShah
@narendramodi
@mieknathshinde pic.twitter.com/zWPWPOUB9U— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2025