
उमेश गायगवळे मुंबई 9769020286
एक छोटासा निर्णय…
पण त्यामागे असलेली मानसिकता – मराठी भाषेला डावलण्याची, तिच्या अस्तित्वावर गदा आणण्याची!
हिंदी सक्तीचा जीआर म्हणजे केवळ कागदावरील नियम नव्हता, तर तो होता मराठी अस्मितेला दिलेला झणझणीत दणका!
मात्र या निर्णयानंतर मराठी समाज एकवटला.
विविध राजकीय संघटना, सामाजिक संस्था, विचारवंत आणि सामान्य जनतेने आवाज उठवला.
या आवाजाला खरी धार दिली ती दोन बंधूंनी — राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी.
मराठीच्या रक्षणासाठी ‘ठाकरे बंधू’ पुन्हा एकत्र?
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ही घटना फार महत्त्वाची ठरते.
एकीकडे शिवसेनेच्या उगमाशी नातं असलेले दोन्ही नेते; पण गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या वाटेवरून चाललेले…
आज मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याची तयारी दाखवत आहेत.
सुरुवातीला वेगवेगळ्या तारखांनी मोर्चा जाहीर केला गेला.
परंतु नंतर ५ जुलै ही एकच तारीख निश्चित झाल्याने एकत्रित कृतीची आशा निर्माण झाली.
महाराष्ट्रभरातून जनतेने याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ही केवळ राजकीय हालचाल नव्हती — ही होती मराठी स्वाभिमानाची पुकारलेली गर्जना.
सरकारची माघार : मराठी जनतेचा ऐक्यबळाचा विजय
राज्य सरकारने हिंदी सक्तीसंदर्भातील दोन्ही जीआर अचानक मागे घेतले.
याला योगायोग म्हणायचं का?
की मराठी समाजाच्या ऐक्याची सत्ता मान्य करत असलेलं हे मौन स्वीकृतीचं लक्षण?
सरकारच्या या निर्णयामुळे मोर्चाचं मूळ उद्दिष्ट साध्य झालं आहे, हे निश्चित.
पण… या लढ्याचा मुख्य मुद्दा फक्त जीआर नव्हता, तर भविष्यात मराठी भाषेच्या हक्कावर होणाऱ्या कुठल्याही अन्यायाविरुद्ध निर्धार व्यक्त करणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले —
“५ जुलैचा कार्यक्रम होणारच. त्याचं स्वरूप वेगळं असेल. कदाचित ही विजयी सभा असेल, कदाचित रॅली.”
या वक्तव्याचं खऱ्या अर्थाने महत्त्व आहे.
कारण ही घोषणा केवळ ‘कार्यक्रम बदलला’ इतपत मर्यादित नाही.
तर ती पुढील एकत्र येण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा ठरू शकते.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी थेट ‘मनसे’चा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना सहभागी होण्याचं आवाहन केलं.
हा उल्लेख अनाहूत नव्हता — त्यामागे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, विशेषतः मराठी अस्मितेसाठी भूतकाळ विसरून पुढे पाहण्याचा दृष्टिकोन आहे.
दोघे एकत्र येणार का?
राज आणि उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र राजकीय प्रवाहांमध्ये आहेत.
कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झाली असली, तरी राजकीय व्यासपीठावर ते एकत्र आलेले नाहीत.
मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे.
महापालिका निवडणुका तोंडावर आहेत.
मुंबई महानगरपालिका, ज्यावर शिवसेनेचा दशकानुदशकांपासून ताबा होता, ती सत्ता आता हातातून जात असल्याचं चित्र आहे.
जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर हे चित्र पुन्हा बदलू शकतं.
मुंबई पुन्हा एकदा मराठी नेतृत्वाच्या हातात येऊ शकते.
‘जनतेच्या अपेक्षा स्पष्ट आहेत’
आज मराठी माणूस एका प्रश्नाने व्याकुळ आहे..
“ही दोन बंधं, ज्यांनी मराठी अस्मितेसाठी आवाज उठवला, ते एकत्र का येऊ शकत नाहीत?”
कोट्यवधी मराठी माणसांची ही अपेक्षा सरकारपेक्षा दोघा नेत्यांपुढे आहे.
यातील कोणताही नेता एकट्याने ही लढाई लढू शकतो, पण दोघं एकत्र आले, तर ही लढाई केवळ यशस्वीच नाही, तर निर्णायक ठरेल.
संवाद सुरु आहे… आशाही कायम आहे
उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच सांगितले …
“राज ठाकरे यांच्याशी थेट चर्चा नाही, पण आमचा संवाद सुरु आहे.”
या विधानाने अनेक शक्यता जागृत केल्या आहेत.
हे विधान केवळ वर्तमानाचं नाही, तर भविष्यातील युतीचं संकेत असू शकतं.
आज नाही… तर कदाचित उद्या हे शक्य होईल, अशी आशा मराठी मन बाळगत आहे.
मराठी एकतेसाठी सत्तेच्या पलीकडे पाहावं लागेल
मराठी अस्मितेचा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नाही,
तो आहे .भाषेचा, संस्कृतीचा, अस्तित्वाचा!
राज आणि उद्धव ठाकरे यांनी आज जर हे समजून घेत एकत्र येण्याचा मार्ग निवडला, तर हे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नसेल, तर ती असेल संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवी दिशा.
५ जुलै ही केवळ तारीख नाही – ती आहे एक संधी!
मराठी मन एकवटतंय.
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही आता काळाची गरज बनली आहे.
आणि जर युती झाली, तर ती केवळ निवडणुकीपुरती नसेल, तर मराठी स्वाभिमानाच्या रक्षणासाठी असेल…!