
पुणे प्रतिनिधी
राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि सध्या आमदार असलेले तानाजी सावंत यांची प्रकृती शनिवारी सायंकाळी अचानक बिघडली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना चक्कर येणे, उलटी होणे आणि हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढल्याची लक्षणे दिसू लागली. तत्काळ त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
प्राथमिक तपासणीनंतर त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
सावंत यांच्या उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोग तज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. त्यांच्या आजारामागचे नेमके कारण शोधण्यासाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत.
वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी सांगितले की, “तानाजी सावंत यांना दाखल केल्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर सतत देखरेख ठेवली जात आहे. पुढील काही दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल.”
दरम्यान, सावंत यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याचे कारण नाही.