
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून, माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी अखेर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला.
काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांच्यानंतर आता बनशेट्टी यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने सोलापुरातील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.
शोभा बनशेट्टी या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या असून, सोलापूर शहर काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी महापौर विश्वनाथप्पा बनशेट्टी यांच्या नातसून आहेत. त्यांनी भाजपकडून सोलापूर महापालिकेत सलग तीन वेळा निवडून येत आपली छाप सोडली होती.
२०१७ मध्ये भाजपने महापालिकेत पहिल्यांदा सत्ता मिळवल्यानंतर बनशेट्टी यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली होती. मात्र, त्याच समाजाचे नेते आणि तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी असलेल्या तणावामुळे त्यांना पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा त्रास सहन करावा लागला.
याच वादातून पुढे बनशेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत थेट विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर करत भाजपला धक्का दिला होता. त्यानंतर पक्षात असूनही त्या सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिल्या होत्या.
शिंदे गटात प्रवेश करताना त्यांच्या सोबत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, महिला नेत्या अनिता माळगे व पती श्रीशैल बनशेट्टी उपस्थित होते. विशेष म्हणजे, यावेळी शोभा बनशेट्टी यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांचे मित्र आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांची उपस्थितीही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
शोभा बनशेट्टी यांच्या प्रवेशामुळे सोलापुरातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला बळकटी मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.