
सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना यंदा वर्षभरात तब्बल १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने नुकतीच वर्षभरातील शाळांच्या सुट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये ५२ रविवार वगळून एकूण ७६ सुट्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
यंदाच्या यादीत, विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी १० दिवसांची (१६ ते २७ ऑक्टोबर) व उन्हाळ्यासाठी तब्बल ३८ दिवसांची (२ मे ते १३ जून) विश्रांती मिळणार आहे.
शाळांचे वेळापत्रक ठरले
जिल्हा परिषदेच्या नियमित शाळांची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी असेल, तर अर्ध्या वेळेच्या शाळा सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत भरतील.
शाळेच्या कामकाजादरम्यान ६० मिनिटांची मोठी सुटी, तसेच प्रत्येक सत्रात १० मिनिटांच्या दोन लहान सुट्या असतील. दुबार सत्र पद्धती लागू असलेल्या शाळांमध्ये १० मिनिटांची लहान आणि ३५ मिनिटांची मोठी सुटी राहणार आहे.
सलग ३ दिवस शाळा बंद नको!
गावातील यात्रा वा इतर अपवाद वगळता, सलग तीन दिवस शाळा बंद ठेवू नयेत, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यादीतील सण त्या दिवशी न आल्यास, मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक ठरेल. तसेच अशा सुटीसाठी किमान तीन दिवस आधी लेखी सूचना देणे आवश्यक राहील.
उर्दू माध्यम शाळांसाठी विशेष वेळा
उर्दू माध्यमाच्या नियमित शाळांची वेळही सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशीच असेल, मात्र अर्ध्या वेळेच्या शाळांसाठी वेळ सकाळी ९ ते साडेबारा असा असेल. रमजानच्या काळात या शाळा सकाळी ९ ते दुपारी २.३० पर्यंत चालतील.
वर्षभरातील सार्वजनिक सुट्यांचा आढावा:
जुलै: आषाढी एकादशी, मोहरम, नागपंचमी – २ सुट्या
ऑगस्ट: रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी – ३ सुट्या
सप्टेंबर: गौरी विसर्जन, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना – ४ सुट्या
ऑक्टोबर: गांधी जयंती, दसरा, दिवाळी सुटी – ११ सुट्या
नोव्हेंबर: गुरुनानक जयंती – १ सुट्टी
डिसेंबर: ख्रिसमस – १ सुट्टी
जानेवारी: मकरसंक्रांती, शबे-ए-मेऱाज, प्रजासत्ताक दिन – ३ सुट्या
फेब्रुवारी: शब-ए-बरात, महाशिवरात्री, शिवाजी महाराज जयंती – ३ सुट्या
मार्च: धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती – ६ सुट्या
एप्रिल: गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – २ सुट्या
मे: महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुटी – २७ दिवस
जून: उन्हाळा सुटी – १२ दिवस
जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक अधिकारातील विशेष सुट्या – २ दिवस
शालेय वर्षात सुट्यांची भरमसाठ संख्या लक्षात घेता, शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वेळेचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षण विभागाच्या या सूचनांनुसार मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी योग्य समन्वय राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.