
सातारा प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज गुरुवारी (दि. २६) सातारा जिल्ह्यात लोणंद येथे आगमन होत असून, संपूर्ण जिल्ह्यात भक्तिभावाने भरलेला आणि उत्साहाने नटलेला माहोल पाहायला मिळत आहे. चार दिवसांचा हा आध्यात्मिक मेळा वारकऱ्यांच्या उपस्थितीने जिल्ह्यात भरून राहणार आहे.
पालखीच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असून, लोणंदपासून तरडगाव, फलटण, बरड अशा विविध ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे. सोमवार (दि. ३०) रोजी हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
प्रशासनाची युद्धपातळीवरील तयारी
वारकरी आणि भाविकांसाठी पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारले असून, ते वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आणि पावसापासून संरक्षणासाठी उपयोगी ठरणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेसह सातारा प्रशासनाने तयारीचा विशेष आढावा घेतला आहे.
उभ्या रिंगणाची पूर्वतयारी पूर्ण
परंपरेप्रमाणे पालखी सोहळा निरा नदी स्नानानंतर लोणंद येथे विसावणार असून, शुक्रवारी (दि. २७) चांदोबाच्या निंब, तरडगाव येथे पहिल्या उभ्या रिंगणाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी फलटण तर रविवारी बरड येथे मुक्काम राहणार आहे.
बंदोबस्तासाठी मजबूत पोलीस यंत्रणा
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २,००० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये १२१ पोलीस अधिकारी, ९०७ पोलीस अंमलदार, १,००० होमगार्ड, एक एसआरपी कंपनी व दोन आरसीपी पथकांचा समावेश आहे.
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र २०० बॅरिकेड्स लावून दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. तब्बल १८०० निर्मलवारी शौचालयांची व्यवस्था आणि तात्पुरते दवाखानेही विविध ठिकाणी उपलब्ध आहेत.
हिरकणी कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मेडिकल सुविधा
पालखीतळांवर महिला भाविकांसाठी हिरकणी कक्ष उभारले गेले असून, लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर सुरक्षेसाठी तैनात आहे. वैद्यकीय पथकांच्या नियुक्तीने आरोग्यविषयक तयारीही पूर्ण आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण
जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून आहेत. फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांची बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.