
पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गम कोकणकडा परिसरात रविवारी उघडकीस आलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. सुमारे 1200 फुट खोल दरीत एका पुरुष आणि महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र पारधी (वय 40) आणि जुन्नर तालुक्यातील रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. रामचंद्र पारधी यांच्याबाबत त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, तर रूपालीच्या बेपत्तापणाबाबत तिच्या कुटुंबीयांनी जुन्नर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती.
पांढरी कार आणि चपलांमुळे उलगडला मृत्यूचा धक्का
जुन्नरच्या प्रसिद्ध रिव्हर्स वॉटरफॉलजवळील दुर्गावाडी परिसरात एक पांढरी कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले. शंका आल्यावर आसपासचा परिसर पिंजून काढण्यात आला असता, दरीच्या कड्यावर स्त्री-पुरुषाच्या चपला आढळून आल्या. रविवार, २२ जून रोजी हवामान खराब असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन राबवले गेले आणि त्या दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले.
शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले; पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी जुन्नर पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रेस्क्यू मोहिमेत जुन्नर रेस्क्यू टीमचे रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण आणि पोलीस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी सहभाग घेतला.
या दोघांमधील संबंध नेमके काय होते, दोघांनी आत्महत्या का केली, की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेने जुन्नर आणि श्रीगोंदा परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासन व स्थानिकांकडून या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.