नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला असून, आता सरळसेवा भरती प्रक्रियेसाठीदेखील पर्सेंटाईल प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. आयोगाने यासंदर्भात परिपत्रक जारी करत नव्या नियमांची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक तसेच विविध गट-कच्या पदांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांमध्ये आता स्पर्धा परीक्षांप्रमाणेच किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू करण्यात येणार आहे. 13 जानेवारी 2021 रोजी कार्य नियमावलीतील नियम 8(vi) मध्ये झालेल्या सुधारनेच्या अधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की हा निर्णय येथून पुढे होणाऱ्या चाळणी परीक्षांपासून लागू करण्यात येईल.
काय आहे पर्सेंटाईल?
पर्सेंटाईल ही अशी प्रणाली आहे, जी एखाद्या उमेदवाराच्या कामगिरीची तुलना इतर सर्व उमेदवारांशी करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराचा पर्सेंटाईल स्कोअर 90 असेल, तर त्याचा अर्थ असा की त्या उमेदवाराने 90 टक्के इतर उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
या प्रणालीचा प्रमुख उद्देश म्हणजे परीक्षा अनेक सत्रांमध्ये (शिफ्टमध्ये) घेतली गेल्यास सर्व उमेदवारांना समान न्याय मिळावा, हे सुनिश्चित करणे. त्यामुळे वेगवेगळ्या सत्रांमधील गुणांच्या फरकामुळे उमेदवारांची संधी बिघडू नये, याची खात्री होते.
परीक्षार्थींनी लक्ष देण्याजोगे
हा निर्णय एमपीएससीच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत मोठा टप्पा ठरणार आहे. उमेदवारांनी नव्या प्रणालीचा अभ्यास करून परीक्षेच्या तयारीत बदल करणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः चाळणी परीक्षांमध्ये आता फक्त टक्केवारी नव्हे, तर संपूर्ण स्पर्धक समूहात आपली स्थिती कशी आहे, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
एमपीएससीच्या या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, न्याय्य आणि आधुनिक प्रणालीवर आधारित होईल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. आगामी परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी ही प्रणाली निर्णायक ठरणार आहे.


