
नागपूर प्रतिनिधी
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पवित्र दीक्षाभूमीला भावनिक भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीस्थळाला अभिवादन करून त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या कार्याची आठवण ताजी केली. यावेळी त्यांनी अभिप्राय नोंदवहीत लिहलेले विचार उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले.
“देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर, लाखो बौद्ध व आंबेडकरी अनुयायांसाठी ऊर्जेचे स्थान असलेल्या चैत्यभूमी आणि आता दीक्षाभूमीला भेट देताना अत्यानंद होत आहे. या पवित्र भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. माझे वडील दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे, सदानंद फुलझेले, वासुदेवराव गाणार आदींचे स्मारक व स्तूप उभारणीत मोठे योगदान होते,” असे त्यांनी लिहले.
“तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेबांचे तत्वज्ञान हे देशाच्या भविष्याला दिशा देणारे आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक व आर्थिक न्यायाच्या संकल्पाची पूर्तता एक जबाबदार नागरिक म्हणून करण्याचा मी प्रयत्न करेन,” असा संकल्पही त्यांनी या वेळी नोंदवला.
या वेळी स्मारक समितीतर्फे सरन्यायाधीश गवई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पूज्य भंते सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुध्दवंदनाही घेण्यात आली. स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, सुधीर फुलझेले, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, सरन्यायाधीशांचे पुत्र ज्योतीरादित्य गवई यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
सुप्रिया सुळेंचीही दीक्षाभूमीला श्रद्धांजली
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शनिवारी दीक्षाभूमीला भेट देत गौतम बुद्धाच्या मूर्तीला वंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीस्थळाला अभिवादन करत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली. यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये, दुनेश्वर पेठे, सलील देशमुख, वर्षा शामकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.