
सोलापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून स्थानिक आणि पांढऱ्या नंबरप्लेटच्या वाहनांसाठी अवघ्या ३,००० रुपयांत २०० हेलपाट्यांचा (ट्रिप्स) वार्षिक टोल पास उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या नव्या योजनेअंतर्गत या सवलतीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त व्यावसायिक वाहनांशिवाय इतर सर्व खासगी वाहनांना मिळणार असून, ट्रिपची मर्यादा २०० पर्यंत असेल. म्हणजेच, एखाद्या वाहनाने एका वर्षात २०० वेळा टोल नाके पार केले की पासची वैधता संपेल. विशेष बाब म्हणजे, या ट्रिपमध्ये कोणताही टोल नाका एकदा ओलांडला तरी तो एक हेलपाटा म्हणून धरला जाणार आहे.
सध्याच्या तुलनेत तिप्पट लाभ
सध्या स्थानिक वाहनांसाठी दरमहा ५० हेलपाट्यांचा पास ३३० रुपयांत उपलब्ध असतो. मात्र, नव्या योजनेत ३,००० रुपयांत तब्बल २०० ट्रिपची सवलत मिळणार आहे. सध्या हीच सेवा घेण्यासाठी वाहनधारकांना सरासरी १०,००० रुपये मोजावे लागतात, त्यामुळे नव्या सवलतीमुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
वेबसाइटवर मिळणार पास
हा सवलतीचा पास ‘एनएचआयडीसीएल’ (NHIDCL) या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन काढता येणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सवलत फक्त स्थानिक वाहनांना मिळत होती, मात्र आता पांढऱ्या नंबरप्लेटच्या वाहनांनाही पहिल्यांदाच या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.
टोल चुकवेगिरीवर सरकारचा चाप
राष्ट्रीय महामार्गावरील टोलपासून बचाव करण्यासाठी अनेक वाहनधारक पर्यायी मार्ग वापरत असल्याने टोलचे नुकसान होत होते. ही पळवाट बंद करण्यासाठी लवकरच जीपीएस-आधारित टोल कपात प्रणाली लागू केली जाणार आहे. सध्या त्याचे प्रात्यक्षिक सुरू असून भविष्यात वाहनाने जितका अंतर प्रवास केला, तितक्याच प्रमाणात फास्ट टॅगमधून टोल कपात होणार आहे.
१५ ऑगस्टपासून नवी अंमलबजावणी
नवीन टोल पास योजना १५ ऑगस्टपासून देशभरात लागू होणार असून, व्यावसायिक वाहनांना वगळता सर्व खासगी वाहनांना याचा लाभ घेता येणार आहे.
“सवलतीचा वार्षिक टोल पास १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. स्थानिक आणि खासगी वाहनधारकांना याचा मोठा फायदा होईल.”
— राकेश जवादे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सोलापूर
महत्त्वाचे मुद्दे :
👉 ३,००० रुपये भरून २०० टोल ट्रिप्सचा पास
👉 फक्त पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनांसाठी
👉 पास NHIDCL वेबसाइटवरून काढावा लागणार
👉 एका वर्षासाठी पास वैध, २०० हेलपाटे पूर्ण झाले की मुदत संपुष्टात
👉 टोल चुकवेगिरी टाळण्यासाठी GPS आधारित प्रणालीची तयारी