
वृत्तसंस्था
2026 साली भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी 13 संघांनी आपले स्थान निश्चित केले असून, यामध्ये कॅनडाचा ऐतिहासिक समावेश झाला आहे. कॅनडाचा संघ पहिल्यांदाच T20 विश्वचषकात आपला सहभाग नोंदवणार असून, त्यांनी अमेरिकेला पराभूत करत या स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे.
2024 मध्ये पार पडलेल्या T20 विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत विजेतेपद मिळवले होते. त्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. सध्या सूर्यकुमार यादवकडे भारतीय T20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
भारत आणि श्रीलंका हे यजमान देश असल्यामुळे त्यांच्या सहभागावर शिक्कामोर्तब झालं असून, उर्वरित संघांनी विविध पात्रता फेऱ्यांमधून आपलं स्थान निश्चित केलं आहे. यामध्ये विशेषतः कॅनडाच्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमेरिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात कॅनडाने प्रभावी कामगिरी करत 57 धावांत अमेरिका संघाचा डाव गुंडाळला. कलीम सना आणि शिवम शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत कॅनडाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर दिलप्रीत बाजवाच्या 14 चेंडूंमध्ये 36 धावांच्या नाबाद खेळीमुळे केवळ 5.3 षटकांत कॅनडाने लक्ष्य गाठत इतिहास रचला.
या विजयानंतर कॅनडाने पहिल्यांदाच T20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली असून, 2026 मधील विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. आगामी स्पर्धेत नवख्या पण जोशपूर्ण कॅनडाच्या संघाकडून काय कमाल पाहायला मिळेल, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.