सांगली | प्रतिनिधी
जिल्ह्यात दोन दिवसांसाठी हवामान विभागाने जाहीर केलेल्या ऑरेंज अलर्टनंतर गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या जोरदार पावसानंतर काही काळ उघडीप मिळाली. मात्र, दुपारी तीननंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढले.
शिराळा, वाळवा, पलूस, मिरज आणि तासगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. सांगली आणि मिरज शहरांतील अनेक भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने शुक्रवारी (दि. १३) देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या चार दिवसांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, गुरुवारी सकाळपासून वातावरणात बदल जाणवत होता. सकाळी १० वाजेपर्यंत काहीशा सरींच्या खंडानंतर पावसाने उघडीप घेतली. दुपारनंतर पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
वाळवा तालुक्यातील आष्टा, बावची, बागणी, तांदूळवाडी, बहादूरवाडी, बोरगाव, नेर्ले भागांत मुसळधार पाऊस झाला. शिराळा तालुक्याच्या बहुतांश गावांत पावसाचा जोर कायम होता. मिरज तालुक्यातील तुंग, कसबे डिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, मौजे डिग्रज, नांद्रे भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. तासगाव शहरासह मांजर्डे, विसापूर, पेड, वायफळे, बलगवडे, बस्तवडे, मणेराजुरी, कवठेएकंद, कुमठे आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतही जोरदार पाऊस पडला.
शहरात पावसामुळे सखल भाग जलमय झाले. सांगली शहरातील काँग्रेस कमिटी, मारुती रोड, भाजी मंडई, स्टँड परिसर, मार्केट यार्ड, स्टेशन चौक, सिटी पोस्ट चौक परिसरात पाणी साचले होते. मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली.
गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे डाळिंब, द्राक्षे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे नुकसानीत आणखी भर पडली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ५ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे – मिरज २.०९ मि.मी., जत २.८, खानापूर ४.१, वाळवा ५.६, तासगाव ६.३, शिराळा ७.६, आटपाडी ३.५, कवठेमहांकाळ ४.४, पलूस ४.५ आणि कडेगाव ८.२ मि.मी.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतीपिकांचे नुकसान अधिकच गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


