
सांगली प्रतिनिधी
संगली, ता. २९ मे – दुधगाव (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या पंचकल्याणक महोत्सवात पूजेसाठी आलेल्या महिलांच्या गर्दीत दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित महिला कोल्हापूर जिल्ह्यातील असून, त्यांच्याकडून अडीच तोळे सोन्याचे गंठन हस्तगत करण्यात आले आहे.
अटक केलेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – लक्ष्मी बाळू सकट (३४, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर), दीपाली किशोर काळे (४०, रा. मालू हायस्कूलजवळ, संभाजीनगर, जयसिंगपूर), सोनू हरी काळे (३५, रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रस्ता, सांगली) आणि शारदा बंटीनाथ हातळगे (४५, रा. नांदणी रोड, जयसिंगपूर).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकुतला शशिकांत पाटील (रा. बोलवाड, ता. मिरज) या महोत्सवात पूजेसाठी गेल्या असताना, जेवणानंतर हात धुत असताना त्यांचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठन चोरीस गेले. याप्रकरणी चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित महिला बुधगाव हायस्कूलजवळ दागिने विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
चारही महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.