
अहमदाबाद, प्रतिनिधी
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन बोईंग 737 विमानाचा भीषण अपघात अहमदाबादमध्ये गुरुवारी सकाळी झाला. टेकऑफनंतर काही क्षणांतच हे विमान कोसळल्याची माहिती असून, यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मेघानीनगर परिसरात विमान कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट झाला. परिसरात काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले असून, आगीच्या भीषण ज्वाळा लांबून दिसत होत्या. प्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर १५ किलोमीटर अंतरावर मेघानीनगरमध्ये हा अपघात झाला.
अपघातानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या तातडीने दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले आहे. विमानाचे अनेक भाग जळून खाक झाले असून, अपघातस्थळी विमानाचे तुकडे विखुरलेले दिसत आहेत. विमानाचा एक पंख तुटून बाजूला पडलेला आढळून आला आहे.
ज्या इमारतीवर हे विमान कोसळले ती इमारतही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे. विमानतळाजवळ असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण करण्यात आली असून, सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात असून, शोध आणि बचाव मोहिम युद्धपातळीवर सुरू आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला असून, अधिकाऱ्यांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.