
सातारा प्रतिनिधी
साताऱ्याच्या भूमीला अखेर ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद लाभले असून, या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत झाली. साताऱ्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नातून मिळालेला हा मान म्हणजे सातारकरांच्या दीर्घकाळच्या इच्छेचा विजय आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता सातारकरांमध्ये असून आपण सर्वांनी मिळून हे संमेलन यशस्वी करायचे आहे,” असा आत्मविश्वास व्यक्त केला. ६६व्या संमेलनाचे आयोजन स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात झाले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी पुन्हा एकदा साताऱ्याला संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना. भोसले बोलत होते. यावेळी कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, माजी नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, विक्रम पाटील, हरिष पाटणे, नंदकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
भोसले म्हणाले, “हा मान काही मोजक्या व्यक्तींचा नसून संपूर्ण जिल्ह्याचा आहे. साताऱ्यात साहित्यप्रेम, शिस्त, नियोजन यांचा संगम असल्यामुळे आपण आर्थिक आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोनातूनही हे संमेलन उत्तम रित्या पार पाडू शकतो. ‘पेन्शनरांचा सातारा’ ही संज्ञा आता इतिहासजमा झाली असून, आजचा सातारा ही खर्च करणाऱ्यांची नगरी आहे,” असे म्हणत त्यांनी सातारकरांची संस्कृती आणि प्रतिभा यांचे कौतुक केले.
“संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे” विनोद कुलकर्णी
विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, “स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी ६६ वे साहित्य संमेलन साताऱ्यात आणले होते. आज त्याच प्रेरणेतून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ९९ वे संमेलन मिळवण्यात आम्हाला यश आले आहे.” मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी साताऱ्यातून एक लाख पत्र पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर दिल्लीत २६ जानेवारी रोजी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनात भाग घेतला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
संमेलनापूर्वी सातारा होणार अधिक सुशोभित
साताऱ्यात संमेलनासाठी देश-विदेशातून पाहुण्यांची गर्दी होणार असल्याने, शहराचे रूप अधिक आकर्षक करण्यावर भर दिला जाणार आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलींद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संमेलनाची तारीख निश्चित केली जाणार असून, त्यापूर्वी शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण हेच मुख्य उद्दिष्ट राहील, असेही ना. भोसले यांनी स्पष्ट केले.
आता राडा संमेलनाच्या नियोजनाचाच!
यापूर्वी संमेलनासाठी आंदोलन किंवा राड्याची चर्चा होती. मात्र आता राडा करायचाच तर तो उत्कृष्ट नियोजनासाठीच व्हावा, अशा शब्दांत भोसले यांनी टोकदार भाष्य केले. त्यांच्या या विधानाला उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांची साथ मिळाली.
सातारा जिल्ह्याने साहित्याच्या मैदानात पुन्हा एकदा आपली ओळख अधोरेखित केली असून, ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही सातारकरांसाठी केवळ सन्मानाची बाब नसून, एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे.