
मुंबई प्रतिनिधी
राजकारण हे संभाव्यतेवर चालतं, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युती चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही नेत्यांच्या अलीकडील परस्पर स्नेहपूर्ण भेटी, सार्वजनिक व्यासपीठावर झालेली प्रशंसात्मक वक्तव्यं आणि भाजपविरोधात वाढती टोकदार भूमिका पाहता ही युती लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांनी अलीकडेच नरेंद्र मोदी यांच्याविरोधात थेट भाष्य केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याचं स्पष्ट होतंय. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेलं महाविकास आघाडीतील स्थान कायम आहे. मात्र, भाजपविरोधातील समान अजेंडा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा या दोघांनाही जवळ आणत असल्याचं चित्र दिसून येतं.
या युतीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपासून ते विधानसभेपर्यंतच्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोघांच्या युतीने मराठी मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकते, असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
सध्या तरी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील युती ही केवळ चर्चा आणि राजकीय अटकळींच्या पातळीवर आहे. प्रत्यक्षात काय घडतं, हे येणारा काळच स्पष्ट करेल. पण एवढं निश्चित की, ही युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मोठा भूकंप घडू शकतो.