
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविड-१९ रुग्णसंख्येत किंचित वाढ होताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं स्पष्ट आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केलं आहे. राज्यात सध्या सर्वेक्षण अंतर्गत रुग्णांची तपासणी केली जात असून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात येत आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण १५,५१० कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी १,२७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजच्या दिवसात राज्यात एकूण ११४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यात सर्वाधिक म्हणजे ४२ रुग्ण पुणे महानगरपालिकेतील आहेत. मुंबईत आज ३७ नवीन रुग्ण आढळले. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा-भाईंदर, पनवेल, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर व परभणी या भागांतील काही रुग्णांचीही नोंद झाली आहे.
राज्यात सध्या ५७७ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जानेवारी २०२५ पासून मुंबईत एकूण ६१२ रुग्ण सापडले असून, यातील बहुतांश रुग्ण मे महिन्यात आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे, बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांसह असून त्यांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार दिले जात आहेत.
गंभीर आजारांची साथ होती.
सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, कोविड रुग्णांची ही वाढ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, देशातील इतर काही राज्यांमध्ये आणि परदेशातही अशाच प्रकारे तुरळक रुग्णवाढ दिसून येत आहे. तरीही तपासणी, उपचार आणि आरोग्य सेवा सज्ज असल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा आरोग्य विभागाने दिला आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतली, तर ही साथ सहजपणे नियंत्रणात ठेवता येईल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.