मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत (टप्पा-२) बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयातील विविध विभाग आणि पोलिस ठाण्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या मोहिमेमध्ये ‘सहाय्यक पोलिस आयुक्त, सायन विभाग’, ‘वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माटुंगा पोलिस ठाणे’ तसेच ‘वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दहिसर पोलिस ठाणे’ यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल त्यांना पोलिस आयुक्त देवन भारती यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले.

या विशेष मोहिमेचा कालावधी ७ सप्टेंबर २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ असा होता. यादरम्यान कार्यालयीन सुधारणा, लोकाभिमुख कार्यपद्धती, तांत्रिक सुधारणा आणि नागरी सेवा क्षेत्रात पारदर्शकता यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या विभागांची निवड करण्यात आली.
या विभागांनी आयुक्तालय स्तरावर ‘द्वितीय’ क्रमांक पटकावत आपली कामगिरी सिद्ध केली असून, त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. भविष्यातही त्यांनी अशीच कामगिरी करून बृहन्मुंबई पोलिस दलाचे नाव उज्ज्वल करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या सन्मानामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हे प्रशंसापत्र त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती ठरत आहे.


