
मुंबई प्रतिनिधी
उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. लोकलमधून चढताना आणि उतरताना काळजी घेणं आणि रेल्वेच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो. मुंबई सेंट्रलला झालेला मृत्यू नियमांचं पालन न केल्याने झाला आहे.
चुकीच्या दिशेने उतरणं या प्रवाशाला महागात पडलं. इतकं की या दुर्घटनेत याचा जीव गेला.
मुंबई सेंट्रल स्थानकावर बुधवारी सकाळी एक विचित्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघाताचा एक धक्कादायक फोटोही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकावरुन विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून ही व्यक्ती प्रवास करीत होती. प्लॅटफॉर्मवरुन उतरण्याऐवजी हा प्रवासी विरुद्ध दिशेने उतरत होता. विरुद्ध दिशेने लोखंडी डिव्हायडर लावले होते. उतरत असताना चुकून त्याचं डोकं डिव्हायडरमध्ये अडकलं आणि यातच त्याचा अत्यंत विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या व्यक्तीच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डनुसार, याचं नाव धीला राजेश हमीरा भाई (27 वय) आहे. लोकलमधून चुकीच्या दिशेने उतरत असताना लोखंडी कुंपणात मान अडकून त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. या घटनेनंतर त्याला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.