
पुणे प्रतिनिधी
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा-सुव्यवस्था अभादीत राहण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलाकरिता सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड (अमानोरा) यांनी नऊ अत्याधुनिक चारचाकी वाहने भेट देण्यात आली.
पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी, तसेच लोकांच्या मदतीसाठी तत्काळ धावून जाण्याकरिता या वाहनांचा उपयोग होणार आहे.
त्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. ‘अमानोरा’तर्फे सामाजिक दायित्वामधून (सीएसआर) ही वाहने भेट देण्यात आली. परिमंडळ पाचमधील पोलीस ठाण्यांना या नवीन वाहनांचे वितरण करण्यात आली. यावेळी सिटी काॅर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
पुणे शहर पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात सद्य:स्थितीत ५१४ चारचाकी आणि ४४५ दुचाकी अशी एकूण ९५९ शासकीय पोलीस वाहने कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३९ पोलीस स्टेशन कार्यरत असून या सर्व पोलीस स्टेशनमध्ये ३९ सीआर मोबाईल आणि १२३ बीट मार्शल वाहने अहोरात्र पुणे शहर हद्दीत गस्त घालत असतात. त्यामुळे शहरात शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते. या व्यतिरिक्त पुणे शहर पोलीस दलात वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, विशेष शाखा, सीआयडी, एटीएस, एसीपी, क्यूआरटी, बीडीएस, आर्थिक गुन्हे शाखा, एसपीयू असे विविध विभागही शहराच्या सेवेत अहोरात्र तत्पर आहेत.
एकंदरित नव्याने निर्माण झालेली सात नवीन पोलीस ठाणी आणि वेगाने वाढणारे-विकसित होणारे पुणे शहर, तसेच शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार, गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपानुसार पोलिसांच्या कामाचे स्वरूपही अधिकाधिक आव्हानात्मक व व्यापक बनले आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, विविध व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींना एस्कॉर्ट व पायलट सेवा पुरवणे, पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रभावीपणे पेट्रोलिंग करणे, बीट मार्शलिंग करणे, विविध गुन्हेगारांना न्यायालयात ने-आण करणे, तसेच गुन्ह्यांच्या तपासाकरिता जिल्ह्यांतर्गत, जिल्हाबाहेर आणि इतर राज्यांमध्ये जाणे-येणे, यांसारख्या विविध कामांसाठी पोलीस दलाला सातत्याने सुसज्ज आणि अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता असते. मोटर परिवहन विभागामार्फतच या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात.
यापूर्वी, पोलिसांची सुमारे ६७० पोलीस वाहने निकामी करून त्यांचा लिलाव करण्यात आला होता. यामुळे, तसेच पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आणि नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे, पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर वाहनांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. पुणे शहरातील सिटी काॅर्पोरेशन यांनी त्यांच्या सीएसआर फंडामधून पुणे शहर पोलीस दलास एकूण नऊ चारचाकी वाहने रीतसर खरेदी प्रक्रिया राबवून प्रदान केली आहेत.