
पुणे प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. वैष्णवीच्या मृत्यनंतर तिच्या लहान बाळाची हेळसांड करून आई-वडिलांना धमकावल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या आहेत.
त्यानंतर आता वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचे संगोपन कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता, याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे ट्विट राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मंत्री आदिती तटकरे यांनी करत ही माहिती दिली.
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून 16 मे रोजी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले होते. सुनेला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर करण्यात आला होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यातच दुसरीकडे या प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करून व वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण गेल्या दहा दिवसापासून फरार होता. त्याचा ही शोध घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून आरोपी निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांनतर वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. या बाबत राज्य सरकारच्या बाल कल्याण समितीने त्याचा निर्णय घेतला आहे. बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कस्पटे यांच्याकडे सोपवली आहे. बाळाचा सांभाळ करण्यासाठी त्या योग्य व्यक्ती असल्याचे सांगत त्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे ट्विट मंत्री आदिती तटकरे यांनी करत ही माहिती दिली आहे.
बाल कल्याण समितीने वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या आजी स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.
यापुढील काळात वैष्णवी हगवणे यांचा मुलगा जनक हगवणे यांचा कायदेशीर ताबा स्वाती कस्पटे यांच्याकडे असणार आहे. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कस्पटे यांची असेल’ असे ट्विट राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे