
मुंबई प्रतिनिधी
आज सकाळपासून सकाळ वातावरण असल्याने मुंबईत दुपारी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात, विशेषतः खार, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, या उपनगरात सामान्य जनजीवन आधीच विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याची नोंद झाली आहे.
जोरदार पावसात अंधेरी पूर्वेकडील पानिपत चौकात एक झाड रिक्षावर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झाड थेट रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षावर कोसळले. यामुळे रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने बृहन्मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. झाड कोसळल्याच्या घटनेनंतर अंधेरी सबवेहून जोगेश्वरी पूर्वेकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
घटनास्थळी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस दाखल झाले आहेत. झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागांत पाणी साचण्याचीही स्थिती आहे. नॅशनल कॉलेजजवळील स्वामी विवेकानंद रोडवरील दृश्यांमध्ये रस्ते अंशतः पाण्याखाली असल्याचे दिसून आले आहे.
पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून वाहने आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. ज्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक मंदावली आणि प्रवाशांची गैरसोय झाली. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या मान्सूनच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जे शहर पावसाळ्याची तयारी करत असताना रहिवाशांसाठी वारंवार चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईतील विविध भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे