
सातारा प्रतिनिधी
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर काम करावे, नागरिकांच्या अडचणी तत्काळ दूर कराव्यात, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, पावसामुळे शेती आणि पशुधनाचे नुकसान झाल्यास पंचनामे तत्काळ सुरू करावेत. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये. दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, स्थलांतरासाठी शासकीय जमिनीचा शोध घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
एनडीआरएफचे एक पथक कोयनानगर येथे तैनात ठेवण्याची सूचना त्यांनी केली. शेंद्रे ते कागल रस्त्याचे काम सुरू असताना सेवा रस्ते मोकळे ठेवावेत, वाहतूक अडथळाविना सुरू राहावी, यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले. महामार्गावर साचणारे पाणी आणि वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन गटारे साफ करण्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, दुष्काळी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी कार्यवाही करावी. दरडप्रवण गावांमध्ये बांबू लागवड करण्याची शिफारसही त्यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महामार्गावरील गटारे मोकळी करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. महामार्गावरील गस्त वाढवण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आणि संभाव्य आपत्तीस्थितींसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.