
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग करण्यास होणाऱ्या विरोधाला न जुमानता राज्य सरकारने पुन्हा आदिवासी विकास विभागाचा निधी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे दीड हजार रुपये लाभ जमा करण्यासाठी आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे.
राज्य शासनाने शुक्रवारी शासन निर्णय जारी करत हा निधी महिला बालविकास विभागाकडे वर्ग केला. यापूर्वीही आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा ७१० कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अनुदानापोटी दिला जाणार आहे त्यामुळे महायुती सरकारला या योजनेसाठी निधी मिळवताना दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलांनी याचा लाभ घेतला. मात्र, सत्तेत येताच लाडकी बहीण योजनेची छाननी सुरू केली. त्यानंतर अनेक महिलांनी योजनेचा लाभ सोडला. सद्यस्थितीत राज्यात २ कोटी ४७ लाख लाभार्थीना लाभ मिळतो; परंतु दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याने इतर खात्यांचा निधी वळवावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारने अनुसूचित जमाती उपाययोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठीही मे महिन्याच्या सुरुवातीलाच ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.
आता पुन्हा एकदा मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी खात्यातून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वळविण्यात आला आहे. यापुढे लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.