
उमेश गायगवळे मुंबई मो. 9769020286
विद्येचं माहेरघर, सुसंस्कृततेचं प्रतिक, महाराष्ट्राचं शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या प्रतिमेला गेल्या काही वर्षांत गालबोट लागलेलं दिसतंय. एकेकाळी देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी धडपडत पुण्याकडे येत असत. आजही जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्था येथे आहेत, मात्र त्याच पुण्याचं नाव आता ‘क्रिमिनल पुणे’ म्हणून घेतलं जाऊ लागलं आहे.
गेल्या काही वर्षांत खुन, बलात्कार, अत्याचार, हुंडाबळी, लूटमार, गाड्यांची तोडफोड, रस्त्यावर खुलेआम हाणामाऱ्या, कोयता गँगचे दहशतवादी कारनामे अशा अनेक घटनांनी पुणे शहर हादरून गेले आहे. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे की, पुणे फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशविदेशाच्या नकाशावर गुन्हेगारीसाठी चर्चेत राहू लागले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आणि शासन यांच्याकडून आरोपींवर अपेक्षित ती कठोर आणि पारदर्शक कारवाई होताना दिसत नाही, अशी नागरिकांची भावना आहे. नुकतंच घडलेलं पोर्शे गाडी अपघात प्रकरण असो, की कोयता गँगची दहशत – प्रशासन केवळ आश्वासनं देण्यात व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रोजच्या रोज गुन्ह्यांची आकडेवारी वाढताना दिसत असून, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
‘कोणालाही सोडलं जाणार नाही’, ‘कायदेशीर कारवाई केली जाईल’ अशा निवेदनांची पुनरावृत्ती मंत्र्यांकडून वारंवार केली जाते. मात्र प्रत्यक्षात किती आरोपींवर कठोर कारवाई होते, याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहतंय.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच घडलेल्या ‘वैष्णवी हगवणे’ मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेने समाजमन हेलावून टाकलं असून, पुन्हा एकदा पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन आणि सरकारकडून ठोस पावलं उचलली जातील का? की केवळ घोषणांच्या पलीकडे ही लढाई जात नाही, हेच सत्य म्हणून पुन्हा एकदा समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
२४ वर्षांची वैष्णवी हगवणे – एक उमलती तरुणी, एक शिक्षित विवाहित स्त्री, जिचे आयुष्य संपले ते केवळ पैशाच्या हव्यासामुळे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे.
पुण्यातील बावधन परिसरात राहणाऱ्या वैष्णवी हगवणे हिने २४ व्या वर्षी आत्महत्या केल्याची बातमी बाहेर येताच समाजात संतापाची लाट उसळली. ही आत्महत्या नव्हे, तर हा स्पष्टपणे एका सुशिक्षित कुटुंबाकडून झालेला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक छळ होता, ज्याचे शेवटचे पाऊल आत्महत्येतून घडले.
वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी, शाही विवाहसोहळा असा कोट्यवधींचा खर्च केला होता. परंतु एवढ्यावर समाधान मानायचं तर दूरच, तिच्या सासरच्यांनी तिला अपमान, शिवीगाळ, मारहाण यांचा रोजचाच सामना करायला लावला. एक ऑडिओ क्लिप आणि पोस्टमार्टम अहवालातून तिच्या शरीरावर सुमारे २० ते २२ मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. ही बाब स्पष्टपणे दाखवते की वैष्णवीचा मृत्यू हा नुसती आत्महत्या नाही, तर एका मानसिक छळाचा भीषण शेवट होता.
या घटनेत सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्ति म्हणजे करिश्मा हगवणे – वैष्णवीची नणंद. एक फॅशन डिझायनर, सामाजिक वर्तुळात ओळख असलेली, अनेक राजकीय नेत्यांशी संपर्कात असलेली ही व्यक्ती घरात मात्र अत्याचाराची मूर्ती होती, असे मयुरी हगवणे हिच्या आरोपांवरून आणि विविध साक्षांवरून दिसून आले. करिश्माचा आई-वडीलांवर, भावांवर व संपूर्ण कुटुंबावर इतका ताबा होता की तिच्या सूचनांवरच घरातील निर्णय घेतले जात होते.
संपूर्ण हगवणे कुटुंब – पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिश्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
म्हणूनच प्रश्न निर्माण होतो – समाज म्हणून आपण कुठे आहोत?
आजही शिक्षित कुटुंबामध्ये हुंड्यासाठी छळ होतो, विवाहित महिलांवर अन्याय होतो आणि त्यांना जगण्याचा हक्क नाकारला जातो, ही अत्यंत शरमेची बाब आहे. एका सूनबाईवर तिचीच नणंद आणि सासरचं कुटुंब इतका अत्याचार करू शकतं, हे केवळ दुर्दैव नव्हे तर समाजातील विकृत मानसिकतेचं प्रतिबिंब आहे.
या घटनेमधून केवळ आरोपींना शिक्षा करून काम भागणार नाही, तर समाजमनही बदलावे लागेल. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांचं संरक्षण, स्वतंत्र अस्तित्व आणि सन्मान कायम राहावा यासाठी कडक कायदे, तत्पर अंमलबजावणी आणि सामाजिक जागृती अत्यावश्यक आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत कारवाई करावी, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी – अशी शिक्षा की समाज पुन्हा असा हिंसक विचार करणार नाही, असा ठोस संदेश जावा.
पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन आणि सरकारकडून ठोस पावलं उचलली जातील का? की केवळ घोषणांच्या पलीकडे ही लढाई जात नाही, हेच सत्य म्हणून पुन्हा एकदा समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वैष्णवी गेली, पण तिची कहाणी समाजासमोर आरसा ठरावी. तिच्या बलिदानातून नवीन जनजागृती व्हावी, आणि दुसऱ्या कोणत्याही वैष्णवीला असा अंत पाहावा लागू नये – हीच खरी श्रद्धांजली ठरेल.