
मुंबई प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असताना मुख्यमंत्री फडवणीस यांनी आज प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे आणि स्वाती कस्पटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैष्णवीच्या मृत्यूचं प्रकरण ही माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. बाळ सुखरुप राहिलं पाहिजे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुढे म्हणाले, वैष्णवीचं बाळ हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आजोबांकडे पोहचलं आहे. वैष्णवीच्या मृतदेहावर जे वळ आढळून आले आहेत, ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत, त्याच अनुषंगाने चौकशी केली जाईल. वैष्णवीच्या वडिलांचं जे म्हणणं आहे त्यावर आधारितच चौकशी केली जाईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
त्यांनी सुनेसोबत वाईट वर्तन केलं तर माझा काय दोष? अजित पवार
मी लग्नाला गेलो, गाडीची चावी द्यायला सांगितली होती. मी देताना विचारलंही होतं. पण त्यांनी सुनेसोबत वाईट वर्तन केलं तर माझा काय दोष? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. ते बारामती येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अजित पवार यांच्या वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नातील उपस्थितीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.