
मुंबई प्रतिनिधी
गुजरातमधील अहमदाबाद शहरात पत्नीचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपीला घाटकोपर पंतनगर पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत शोधून ताब्यात घेतले. आरोपीला तात्काळ अटक करून गुजरातच्या नारोल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी पंतनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील नारोल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७७/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०२ आणि गुजरात पोलीस अधिनियम १३५ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणातील पीडित महिला रीना राजेंद्र वर्मा हिची हत्या तिच्या पतीनेच – अनिल उर्फ बोबी जंगम (रा. साठे नगर, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व) – केली होती.
गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. नारोल पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल फोनच्या लोकेशनच्या आधारे तो पुन्हा घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात परतल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर नारोल पोलिसांच्या विनंतीवरून घाटकोपर पंतनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला व अत्यंत शिताफीने त्याला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला गुजरात येथून आलेल्या पोलिस पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
पीडित महिला रीना वर्मा आणि आरोपी अनिल जंगम हे दोघे २०१७ पासून एकत्र राहत होते आणि कामानिमित्त अहमदाबादमध्ये गेले होते. २० मे २०२५ रोजी चारित्र्यावरून संशय आल्याने आरोपीने पत्नीचा निर्घृण खून केला होता.
सध्या आरोपीविरोधात पुढील तपास नारोल पोलिस करीत आहेत. घाटकोपर पंतनगर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आरोपीच्या अटकेमुळे न्याय प्रक्रियेला गती मिळणार आहे.