
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने गंभीर गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींना ठाणे येथील वाघबीळ जंगल परिसरातून सापळा रचून अटक केली आहे. या उल्लेखनीय कारवाईने परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
१३ मे २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता फिर्यादी हे घरी परत येत असताना दत्ता मंगेश पाटील उर्फ शेरू व महेश कृष्णा महाराणा उर्फ पांडा यांनी त्यांना विनाकारण धक्का देऊन शिवीगाळ केली आणि मारहाण करत जखमी केले. या वेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भाऊजींवर चॉपरने हल्ला करण्यात आला. त्याचप्रमाणे फिर्यादीच्या वडिलांवरही छातीत चॉपरने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.
याशिवाय, प्रतिक प्रविण सकपाळ व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी देखील हातात चॉपर घेऊन लोकांसमोर दहशत निर्माण केली आणि फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २९३/२०२५ नुसार विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक कौशल्य आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी ठाणे येथील घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा परिसरात सापळा रचून आरोपी दत्ता मंगेश पाटील उर्फ शेरू (३०) आणि मनिष सनातन साहू उर्फ चिंटू (२४) यांना अटक केली.
अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र श्रीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
सदर कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवानंद देवकर, सपोनि नेवसे, पो.उ.नि. अमर चेडे, पो.ह. गांगुर्डे, गवारे, सांगळे, परदेशी, महाजन, पाटील, मालगुंडे, विशे, उगले व इतर पथकातील सदस्यांचा मोलाचा सहभाग होता. पुढील तपास सुरू आहे.