कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे येथे दरोड्याचा बनाव रचून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी दरोडा टाकून पत्नीची हत्या केली अशी पतीने पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती.
मडिलगे (ता. आजरा) येथे रविवारी पडाटे दरोडा पडला असा बनाव पतीने रचला. पतीनेच पत्नीचा खून करून वाचण्यासाठी दरोड्याचा बनाव रचला होता. मात्र, मृतदेहावरच्या दागिन्यांमुळे, आणि पतीने सांगितलेली हकिकत आणि घटनास्थळावरील परिस्थिती या सर्व गोष्टींमधील विसंगती पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी फिर्यादी पतीचीच उलट चौकशी सुरू केली. पतीला पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर पतीनेच पत्नीचा खून आपणच केल्याची कबुली दिली
पोलिसांनी आरोपी पती, मडिलगेचा माजी उपसरपंच सुशांत सुरेश गुरव याला अटक केली आहे. मडिलगे येथील पूजा सुशांत गुरव यांच्या खुनाचा तपास आजरा पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत उघड केला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास 2.30 वाजता घरात दरोडा पडला असून, दरोडेखोरांनी पत्नीचा धारदार हत्याराने खून केला तसेच सोने व रोख रक्कम लंपास केली अशी फिर्याद सुशांत गुरव याने आजरा पोलिसांत दिली होती. त्याआधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आणि चौकशीत अवघ्या 24 तासांमध्ये खुनाचा उलगडा झाला.
या कारणासाठी केला पत्नीचा खून
कर्जाची परतफेड करण्यासाठी पतीने पत्नीला दागिने गहाण ठेवायला दे, अशी मागणी पूजाकडे केली होती. पूजाने दागिने देण्यास नकार देताच दोघांमध्ये वाद झाले होते. त्यातूनच सुशांतने दगड व खोऱ्याने पूजाच्या डोक्यात अमानुषपणे वार केले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. आपण सापडू नये यासाठी संशयिताने दरोड्याचा बनाव केला; मात्र हा बनाव पोलिसांनी 24 तासांत उघड केला.
हत्यार फेकले गोबर गॅसमध्ये
आरोपीने खोऱ्याने पूजाच्या डोक्यात गंभीर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात घरातच टाकले व वापरलेले हत्यार संशयिताने गोबर गॅसमध्ये नेऊन टाकले.
पोलिसांना नवऱ्यावर शक..
फिर्याद देताना आरोपीने दरोडेखोरांनी पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडने वार केल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात धारदार हत्याराने वार केल्याचे पोलिसांना आढळून आले होते. दागिने दरोडेखोरांनी नेले, असे आरोपी पतीने म्हटले होते. मात्र, मृतदेहाच्या मंगळसूत्र, बांगड्या अंगावर तसेच कपाटातील दागिने तसेच होते. साड्या विस्कटल्या होत्या, मात्र त्यावर जखमांचे रक्त पडलेले नव्हते. आरोपीने दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यामुळेच पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादी पतीवर गेली आणि या खुनाचा उलगडा झाला.


